बँकांमध्ये लाबंच लांब रांगा
By admin | Published: November 11, 2016 12:59 AM2016-11-11T00:59:06+5:302016-11-11T00:59:06+5:30
मंगळवारच्या मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा होताच बुधवारपासून नागरिकांची भागम्भाग सुरू झाली आहे.
अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त : नोटा बदलण्यासाठी ग्राहकांची भागम्भाग
चंद्रपूर : मंगळवारच्या मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा होताच बुधवारपासून नागरिकांची भागम्भाग सुरू झाली आहे. बुधवारी बंद असलेल्या बँका गुरूवारी सकाळी सुरू होताच ग्राहकांची एकच गर्दी झाली. त्यामुळे जवळपास सर्वच बँकांमध्ये ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
नोटा बदलून देण्यासाठी शासनाने मुदत दिली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा आहेत, त्यांची बुधवारी सकाळपासूनच धावपळ सुरू दिसली. नोटा बंद झाल्याच्या भितीने अनेक व्यवसायिकांनी ५०० व १००० च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. तर पेट्रोल पंप, रूणालये, रेल्वे टिकीट घर, बस प्रवासादरम्यान नोटा स्वीकारणे अनिवार्य असतानाही सुट्टे नसल्याच्या कारणावरून नोटा स्वीकारण्यात आले नाही.
परिणामी गुरूवारीही सर्वत्र प्रचंड गोंधळ उडालेला दिसून आला. गुजरी बाजारातही चिल्लर अभावी शुकशुकाट दिसून आला. (स्थानिक प्रतिनिधी)
नोटा बदलून घेण्यासाठी कमिशन
गुरूवारी सकाळी बँका सुरू होताच ग्राहकांना दोन हजारच्या नवीन नोटा देण्यात आल्या. त्यामुळे अनेक ग्राहक कौतुकाने नवीन नोटा निरखुन पाहत होते. बचत खात्यावर रक्कम जमा करणाऱ्यांची अलोट गर्दी होत असतानाच नोटा बदलून घेण्यासाठीही वेगळ्या रांगा बँकेत लागलेल्या दिसल्या. मात्र यात ४ हजार रूपयांपर्यंतच नोटा बदलून दिल्या जात असल्याने काहींनी कमिशनवर दुसऱ्या व्यक्तीला रांगेत उभे करून नोटा बदलून घेतल्या.