श्रमिक एल्गारचा चंद्रपुरात अन्न, पाणी मोर्चा
By Admin | Published: January 24, 2017 12:42 AM2017-01-24T00:42:29+5:302017-01-24T00:42:29+5:30
एपीलधारकांना धान्याचा पुरवठा करण्याच्या मागणीसह अनेक मागण्याच्या पूर्ततेसाठी श्रमिक एल्गारच्यावतीने महिलांचा ‘अन्न पाणी मोर्चा’ काढण्यात आला.
एसडीओंना निवेदन : एपीएलधारकांना धान्य पुरवठा करण्याची मागणी
चंद्रपूर : एपीलधारकांना धान्याचा पुरवठा करण्याच्या मागणीसह अनेक मागण्याच्या पूर्ततेसाठी श्रमिक एल्गारच्यावतीने महिलांचा ‘अन्न पाणी मोर्चा’ काढण्यात आला. सदर मोर्चा श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा पारोमिता गोस्वामी यांनी नेतृत्वात सोमवारला दुपारी १ वाजता आझाद गॉर्डनपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येऊन आपल्या मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले.
शासनाने एपीएलधारकांना धान्य देणे बंद केले, तसेच जिल्ह्यातील अनेक कुटूंबाजवळ राशन कॉर्ड नाही, तसेच नागरिकांना देण्यात येणारे राशन हे अत्यंत तोडके आहे. त्यामुळे राशनामध्ये वाढ करण्यात यावी, तसेच बल्लारपूर तालुक्यातील विसापूर हे गाव ग्रामीण असूनसुद्धा त्याचा शहरी म्हणून सरकारने गणना केली. त्यामुळे येथील नागरिकांना अन्न सुरक्षा लाभापासून वंचीत राहावे लागत आहे. आदी या मागण्याच्या पुर्ततेसाठी मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी, उपाध्यक्ष विजय सिद्धावार, महासचिव घनश्याम मेश्राम, महासचिव छाया शिडाम, बिंदू गडलींग यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी)
चंद्रपुरातील पाणी
समस्या सोडवावी
चंद्रपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या आहे. शहरातील जलनगर परिसरात १०० च्यावर घरे आहेत. मात्र याठिकाणी फक्त एकच सार्वजनिक नळ आहे. तसेच बाबूपेठ, बगर खिडकी, सोनझरी आदी परिसरातसुद्धा पाण्याची समस्या बिकट आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे चंद्रपूर शहरातील पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.