वेतनप्रकरणाची कामगार विभाग करणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:54 AM2021-03-04T04:54:30+5:302021-03-04T04:54:30+5:30
जनविकास कामगार संघाने डेरा आंदोलन सुरू केल्यानंतर उद्योग उर्जा व कामगार विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन पाटणकर यांच्याकडे यापूर्वीच थकित ...
जनविकास कामगार संघाने डेरा आंदोलन सुरू केल्यानंतर उद्योग उर्जा व कामगार विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन पाटणकर यांच्याकडे यापूर्वीच थकित पगार व किमान वेतनाबाबत तक्रार करण्यात आली होती. समस्येचा निपटारा करण्यासाठी कामगार विभागाने वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाला २८ फेब्रुवारीपर्यंत वेळ दिली. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयाने कामगारांचे वेतन बँक खात्यात जमा केले नाही. त्यामुळे बुधवारी सरकारी कामगार अधिकारी छाया नांदे तसेच निरीक्षक माधव बारई यांच्या नेतृत्वातील चौकशी पथक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. दुपारी कामगारांच्या वेतनाबाबत सर्व कागदपत्रांची तपासणी केली. शासनाने ठरवून दिलेल्या किमान वेतनानुसार पगार व भत्ते देण्यामध्ये त्रुटी आढळल्याने सात दिवसांची मुदत दिली. या कालावधीत समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास कामगार विभागातर्फे न्यायालयात फौजदारी कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, कामगारांच्या डेरा आंदोलनाला शहरातील विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे.