तेदूपत्ता संकलनासाठी मजुरांची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:27 AM2021-05-24T04:27:17+5:302021-05-24T04:27:17+5:30
२५ किमीची भटकंती : वनविभागाचे दुर्लक्ष प्रकाश पाटील मासळ ( बु ) : सध्या कोरोना संक्रमणाची लाट शहरी भागासह ...
२५ किमीची भटकंती : वनविभागाचे दुर्लक्ष
प्रकाश पाटील
मासळ ( बु ) : सध्या कोरोना संक्रमणाची लाट शहरी भागासह ग्रामीण भागातही पोहोचली आहे. लॉकडाऊन काळात मजुरांचा रोजगार बुडाला. अशातच ग्रामीण भागात तेंदूपत्ता संकलन सुरू झाल्याने आशा पल्लवित झाल्या. मात्र, मजुरांना २५ किमी अंतरावरून तेंदूपत्ता संकलनासाठी पायपीट करावी लागत आहे.
लॉकडाऊनमुळे शहरी व ग्रामीण भागातील मजूर स्वगावी परत आले. मात्र, त्यांच्या समोर रोजगाराचा प्रश्न उभा राहिला. याच महिन्यात तेंदूपत्ता संकलनाला ग्रामीण भागात सुरुवात झाली. तेंदूपत्ताच्या माध्यमातून रोजगार मिळाला. आर्थिक विवंचनेतून बाहेर येण्याच्या आशाने मजूर कामाला लागला. तेंदूपत्ता संकलन हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बफर, कोर झोन व नॅशनल प्रकल्पामध्ये येतो. त्यामुळे मजुरांना २५ किमीची पायपीट करून बफर झोन क्षेत्रातील भागात तेंदूपत्ता संकलन करावा लागतो, परंतु त्या परिसरात तेंदूपत्ता नसल्याने पळसगाव पिपर्डा येथील मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी मासळ परिसरातील तळोधी (नाईक) परिसरातील बोरगाव रिठच्या जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी येतात. याच परिसरात टेकेपार येथेही तेंदूपत्ता संकलन फळी आहे. या परिसरातील मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी जातात. मात्र, अनेक गावांतील मजूर जंगलात फारशा प्रमाणात तेंदूपत्ता नसल्याने, कोणत्याही झाडांची पाने तोडून तेंदूपत्ताच्या पुडक्यात टाकल्या जात आहे. इतरही झाडांचे नुकसान मजूर करीत आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असून, तेंदूपत्ता ठेकेदाराला अभय दिल्याचे बोलले जात आहे.
बॉक्स
वन्यप्राण्यांचेही हल्ले
परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर हल्ला करून ठार मारल्याची घटना नुकतीच घडली आहे. उन्हाची दाहकता त्यामुळे जंगलात पाणवठ्याचे पाणी आटले आहे. हिंस्त्र प्राण्याची पाण्यासाठी भटकंती होत आहे. परिसरातील अनेकांना वाघाचे दर्शन होत आहे. अशातच तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांवर वाघाचा हल्ला झाला, तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक विचारत आहे.