कानशिलात लगावल्याचा मजुराने काढला वचपा; कंत्राटदाराची हत्या
By परिमल डोहणे | Published: September 6, 2022 10:30 AM2022-09-06T10:30:07+5:302022-09-06T10:34:08+5:30
चंद्रपुरातील थरारक घटना : आरोपीला अटक
चंद्रपूर : झोपेत असलेल्या मजुराला बांधकाम कंत्राटदाराने कानशिलात लगावल्याने संतापलेल्या मजुराने चक्क बांधकाम कंत्राटदाराला लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. मारहाणीत कंत्राटदाराच्या गुप्तांगाला जबर मार बसल्याने उपचारादरम्यान त्या कंत्राटदाराचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी चंद्रपुरातील श्री टॉकीज परिसरात घडली.
समीर रत्नाकर भोयर (३९) रा. श्रीराम वॉर्ड, रामाळा तलाव, चंद्रपूर असे मृत बांधकाम कंत्राटदाराचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी गजानन अशोक हल्लारवार (३६) रा. कॉलरी वॉर्ड, वरोरा याच्यावर कलम ३०२ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायधीशांनी त्याला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गजानन हल्लारवार हा मुळचा वरोरा येथील रहिवासी आहे. तो कामाच्या शोधात १५ दिवसांपूर्वी चंद्रपूर येथे आला होता. श्री टॉकीज चौकातील फुटपाथवर तो वास्तव्यास होता. दरम्यान तो समीर भोयर या बांधकाम कंत्राटदाराकडे मजुरीने जाऊ लागला. शनिवारी शनिवारी भोयर श्री टाॅकीज परिसरात मजुराच्या शोधात गेले असता, त्याला गजानन झोपून दिसला. त्याला उठविण्यासाठी समीरने त्याच्या कानशिलात लगावली. गजानन दचकून जागा झाला. ‘तुने, मला का मारले, असे विचारत समीरला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत समीरच्या गुप्तांगाला जबर मार बसला. यावेळी समिरला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान शनिवारीच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबतची तक्रार मृतकाच्या पत्नीने शहर पोलिसांत केली होती. पोलिसांनी मर्ग दाखल करुन तपास सुरु केला. दरम्यान डॉक्टरांनी गुप्तांगाला जबर मार बसल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. पोलिसांनी अधिक तपासात शनिवारी गजानने समीरला जबर मारहाण केल्याची माहिती समोर आली. प्रत्यक्षदर्शिनेही कुबली दिली. त्यावरुन गजाननला ताब्यात घेतले. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला ८ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अतुल थुल यांच्या नेतृत्वात बाबा डोमकावळे, सुरेंद्र खनके, शहबाज सय्यद, दर्शन फुलझेले यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.