रुग्णवाहिकेत ‘बाय पॅप’ मशीनचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:58 PM2019-01-14T22:58:53+5:302019-01-14T22:59:18+5:30
रुग्णांना सेवा पुरविण्याच्या दृष्टीने शासनाने मोठा गाजावाजा करीत रुग्णवाहिका सुरु केल्या. मात्र या रुग्णवाहिकेमध्ये ‘बाय पॅप’ मशिनचा अभाव असल्याने रुग्णाला नेताना अडचण जात आहे. परिणामी अनेक रुग्णांचा जीव गेल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्व रुग्णवाहिकेमध्ये ‘बाय पॅप’ मशीन बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.
परीमल डोहणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रुग्णांना सेवा पुरविण्याच्या दृष्टीने शासनाने मोठा गाजावाजा करीत रुग्णवाहिका सुरु केल्या. मात्र या रुग्णवाहिकेमध्ये ‘बाय पॅप’ मशिनचा अभाव असल्याने रुग्णाला नेताना अडचण जात आहे. परिणामी अनेक रुग्णांचा जीव गेल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्व रुग्णवाहिकेमध्ये ‘बाय पॅप’ मशीन बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.
दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असल्यामुळे श्वसनाच्या आजार झपाट्याने वाढत आहे. अशा आजारात बऱ्याच रुग्णाला श्वासोच्छवास घ्यायला अडचण जाते. त्यावेळेस रुग्णाला आॅक्सिजन देण्यात येतो. दरम्यान, आॅक्सिजन फ्यॉचुरेशन होत असल्यास रुग्णाला व्हेंटिलेट करण्यात येते.
या प्रक्रियेत रुग्णाच्या घश्यात नळी टाकून फुफ्फुसाच्या आत आॅक्सिजन सोडण्यात येते. मात्र या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने बरेचदा डॉक्टर रुग्णाला ‘बाय पॅप’ मास्कद्वारे आॅक्सिजन देत असतात. मास्कचे प्रेशर जास्त असल्यामुळे हवा श्वासनलिका मोठी करते. अशा चिंताजनक स्थितीत रुग्णाला रुग्णवाहिकेद्वारा रुग्णालयात हलवायचे असल्यास ‘बाय पॅप’ मास्कची आवश्यक्ता भासते. मात्र रुग्णावाहिकेत असे मशिन व मास्क उपलब्ध नसल्याने रुग्णाला रेफर करताना मोठी अडचण जाते. परिणामी रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व रुग्णवाहिकेमध्ये ‘बाय पॅप’ मशीन बसवावी, अशी मागणी होत आहे.
‘१०८’ च्या रुग्णावाहिकेतही ‘बाय पॅप’ नाही
रुग्णांना तत्काळ सेवा मिळावी, यासाठी शासनाने १०८ क्रमाकांची रुग्णवाहिका सुरु केली आहे. महाराष्ट्रात ९७३ रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिकेत सर्व सुविधा असल्याचा गाजावाजा करण्यात आला. मात्र या रुग्णवाहिकेत बाय पॅप मशीनचा अभाव आहे. त्यासोबत ९९९ क्रमांकाच्या व खासगी रुग्णवाहिकेतसुद्धा बायपॅप मशीन नसल्याची माहिती आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या सुविधा उपलब्ध
१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी शासनाने ज्या सुविधा दिल्या आहेत, त्या सर्व सुविधा उपलब्ध असतात. त्याव्यतिरिक्त सुविधाचा वापर करता येत नाही. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत बाय पॅप मशीनपेक्षा उच्च दर्जाच्या मशीन असतात. त्यामध्ये व्हेंटिलेटर, अम्बुबॅग या मशीन असल्याने रुग्णाला रुग्णवाहिकेतून हलविताना कोणतीही अडचण जात नाही, अशी माहिती पुणे येथील मुख्य कार्यालयातील डॉ. जोत्सना माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.