आयसीयू विभागातच दक्षतेचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:50 AM2017-09-10T00:50:20+5:302017-09-10T00:50:45+5:30
चंद्रपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्यात आले. त्यामुळे आता जिल्हावासीयांना चांगली आरोग्यसेवा मिळेल, अशी अपेक्षा होती.
रवी जवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्यात आले. त्यामुळे आता जिल्हावासीयांना चांगली आरोग्यसेवा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आरोग्य सेवेशी निगडित यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाची कमतरता या दोन गोष्टींचा जिल्हा सामान्य रुग्णालयात अभाव असल्यामुळे त्याचा आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे. येथे अतिदक्षता विभाग असला तरी या विभागासाठी असणाºया पायभूत सुविधाच या ठिकाणी नसल्याची माहिती समोर आली आहे.
अतिदक्षता विभागात येणारा प्रत्येक रुग्ण अत्यंत गंभीर असतो. त्याच्यावर या ठिकाणी अतिशय गांभीर्याने उपचार करावा लागतो. त्यासाठी अत्याधुनिक यंत्र आणि ते हाताळणाºया प्रशिक्षित मनुष्यबळ असावा लागतो. मात्र चंद्रपुरातील अतिदक्षता विभागात या दोन्ही गोष्टीची वानवा आहे. अतिदक्षता विभागात मुबलक आॅक्सीजन सिलिंडर हवे, बॉयोपॅप, सीपॅप, व्हेंटीलेटर हवे, डोप्यामीन, नॉर अॅड्रानॅलीन आणि ते देण्यासाठी मायक्रोड्रीप युनीट हवे. मात्र येथील सामान्य रुग्णालयात यातील अनेक गोष्टी नाही. व्हेंटीलेटर अलिकडेच खरेदी केले आहे, मात्र ते हाताळणारा प्रशिक्षित मनुष्यबळ नाही.
रुग्णालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार जिल्हाभरातून वा गडचिरोली जिल्ह्यातून दररोज सुमारे साडेतीनशे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले जातात. सहाजिकच ते गंभीर रुग्ण असतात. मात्र येथील आयसीयूमध्ये केवळ सहाच रुग्णांना ठेवता येते. तेवढीच उपलब्धता येथे आहे. मात्र दररोज येथे येणाºया १५ ते २० रुग्णांना आयसीयूची गरज भासते. येथील कार्यरत तज्ज्ञ डॉक्टरांना इच्छा व रुग्णाची गरज असूनही सर्व रुग्णांना आयसीयूमध्ये ट्रीटमेंट देता येत नाही. यामुळे स्वाभाविकच रुग्णांची हेळसांड होते. या भानगडीत काही रुग्ण दगावतात देखील.
मेडीकल कॉलेज झाले; मात्र रुग्णालय तसेच
चंद्रपूरला शासकीय मेडीकल कॉलेज आले. याला आता तीन वर्षांचा कालावधी होत आहे. मेडीकल कॉलेज अस्तित्वात असताना प्रत्येक गंभीर रुग्णावर चंद्रपुरातच उपचार होणे अपेक्षित होते. मात्र अजूनही चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातून वा एखाद्या खासगी इस्पीतळातून ‘रेफर टू नागपूर’ चा प्रकार सुरूच आहे. मेडीकल कॉलेज आहे, जिल्हा रुग्णालय आहे, शहरात अनेक ठिकाणी जागाही उपलब्ध आहे. तरीही रुग्णालयाची स्थिती आणि तेथील सुविधा अत्याधुनिक झालेल्या नाही. कधी आजाराशी निगडित यंत्र उपलब्ध नसते. यंत्र असेल तर ते देखभालीअभावी नादुरुस्त असते तर कधी यंत्र हाताळणारे प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी नसतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील अतिदक्षता विभागात रुग्णांसाठी जागाही नसते. या सर्व प्रकारामुळे डॉक्टरांना नाईलाजाने रुग्णांना ‘रेफर टू नागपूर’ करावे लागते.
डॉक्टरांचाही नाईलाज
जिल्हा सामान्य रुग्णालयात रुजू होऊन रुग्णांना मनोभावे सेवा देऊ इच्छीणारे अनेक डॉक्टरही येथे कार्यरत आहेत. अनेकवेळा हे डॉक्टर राऊंडवर असताना रुग्णांना भेटतात. त्यावेळी जमिनीवर चादर टाकून उपचार घेत असलेला रुग्ण बघून त्यांच्याही डोळ्यात अश्रूू तरळते. परंतु डॉक्टर असल्याने संवेदनशिलता बाजूला सारून त्यांना आहे त्या स्थितीत उपचार करावा लागतो. हा सर्व प्रकार सुविधांच्या अभावामुळेच होत आहे.