तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:29 AM2019-01-07T00:29:44+5:302019-01-07T00:30:13+5:30
रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने मूल येथील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करून शंभर खाटांचे श्रेणीवर्धीत रूग्णालय तयार करण्यात आले. मात्र आजच्या स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती येथील उपजिल्हा रूग्णालयात केलेली नसल्यामुळे अनेक रूग्णांची हेडसांड होत आहे.
भोजराज गोवर्धन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने मूल येथील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करून शंभर खाटांचे श्रेणीवर्धीत रूग्णालय तयार करण्यात आले. मात्र आजच्या स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती येथील उपजिल्हा रूग्णालयात केलेली नसल्यामुळे अनेक रूग्णांची हेडसांड होत आहे. बहुतांश रूग्णांना रेफर टू चंद्रपूर, गडचिरोली केले जात आहे. रूग्णांची होणारी हेडसांड थांबविण्यासाठी आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
जागतिक बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र आरोग्य विकास प्रकल्पांतर्गत येथील ग्रामीण रूग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रूग्णालयामध्ये करण्यात आलेले आहे. तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ. दिग्वीजय खानविलकर यांच्या हस्ते सदर रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा ५ मे २००२ रोजी मोठया दिमाखात पार पडला. यावेळी तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री एकनाथराव गायकवाड उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सदर रूग्णालयात स्त्रि रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, शल्यचिकीत्सक हे महत्वाचे पद नेहमीसाठी भरण्यात येईल, असे आश्वासन दिले. परंतु सहा वर्षांचा कार्यकाळ लोटून गेला. मात्र अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणुक करण्यात आली नाही.
येथील उपजिल्हा रूग्णात डॉ. सुर्यकांत बाबर हे वैद्यकीय अधिक्षक म्हणून कार्यरत आहे, तर वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. उज्वलकुमार इंदूरकर, डॉ. चंद्रागडे, डॉ. मेश्राम हे कर्तव्य बजावित आहे. चिमूर ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवतकर यांची मूल उपजिल्हा रूग्णालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. परंतु तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणुक करण्यात आलेली नाही. सदर रूग्णालयात रोज किमान दोनशे ते अडीचशेच्या जवळपास रूग्णांची नोंदणी होत आहे.
रूग्णालयात आयुष क्लिनीक कार्यरत आहे. आयुष क्लिनीकमधील डॉक्टरांकडून रूग्णांवर उपचार केला जात आहे. उपजिल्हा रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टराअभावी रूग्णांवर योग्य उपचार होत नाही. काही रूग्णांना चंद्रपूर व इतर ठिकाणी रेफर करावे लागते. यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणुक करणे गरजेचे आहे.
रुग्णांसोबत वाईट वागणूक
ग्रामीण भागातील रूग्ण मोठया प्रमाणावर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ येत असतात. मात्र येथील काही डॉक्टर रूग्णांशी सामंजस्याने बोलत नसल्याने डॉक्टरांप्रति तिव्र रोष व्यक्त केला जात आहे. तब्बल ११ वर्षानंतर मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षकांचे पद कायमस्वरूपी भरण्यात आलेले आहे. रूग्णालय प्रशासन साभाळण्याची संपुर्ण जबाबदारी वैद्यकीय अधिक्षकांची असते, त्यांनीही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, परंतु त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.