सरपंचांनीच ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 10:14 PM2017-10-08T22:14:28+5:302017-10-08T22:14:39+5:30
सरपंचांची स्वाक्षरी चोरल्याची घटना ताजी असताना पाचगाव येथील सरपंचांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकल्याने सर्वच शासकीय विकास कामांचा खेळखंडोबा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : सरपंचांची स्वाक्षरी चोरल्याची घटना ताजी असताना पाचगाव येथील सरपंचांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकल्याने सर्वच शासकीय विकास कामांचा खेळखंडोबा झाला आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून ग्रामपंचायतीचे सर्वच व्यवहार ठप्प पडले आहे.
राजुरा तालुक्यातील पाचगाव ग्रामपंचायतीत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. मागील महिन्यात येथील सरपंचांची स्वाक्षरी चोरल्याची बोंब ताजी असतानाच येथील सरपंच रसिका उदे यांनी दोन दिवसांपूर्वी चक्क ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकले. मात्र असे कुलूप लावण्याविषयी कोणाचीही परवानगी घेण्यात आली नाही. किंवा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत असा कोणताच ठराव घेण्यात आला नाही. मग गावाचा प्रथम नागरिक असतानाही सरपंचांना ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून ग्रामपंचायतीचे कामकाज बंद पाडण्याचा अधिकार कुणी दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ग्रामपंचायतीला दोन दिवसांपासून कुलूप असल्याने ग्रा.प. कार्यालयातून होणारे सर्वच व्यवहार ठप्प पडले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने होणारा नळ योजनेचा पाणीपुरवठा बंद पडला असून गावकºयांचा पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. गावकºयांना व विद्यार्थ्यांना लागणारे रहिवासी दाखले ना हरकत प्रमाणपत्र व ग्रामपंचायतीचे सर्वच शासकीय कामांचा खोळंबा झाला असून शासकीय कामात सरपंच अडथळा आणत असल्याचा आरोप उपसरपंच गोपाल जंबुलवार यांनी केला आहे. सरपंचांवर कारवाई करुन अपात्र घोषित करावे, अशी मागणी उपसरपंच गोपाल जंबुलवार यांनी जिल्हाधिकाºयाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. याबाबत सरपंच रसिका उदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
गावाचा प्रथम नागरिक असलेल्या सरपंचांनीच ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. याबाबत कुणालाही माहिती दिली नाही किंवा कुणाची परवानगीही घेतली नाही. हे सर्व काम नियमबाह्य असून ग्रामपंचायतीचे सर्व व्यवहार ठप्प पडले असून सरपंचावर कडक कारवाई करावी.
- गोपाल जंबूलवार, उपसरपंच,पाचगाव