लाडकी बहीण योजना, चंद्रपूर मनपाने सुरू केले निःशुल्क सेवा केंद्र
By साईनाथ कुचनकार | Published: July 3, 2024 05:54 PM2024-07-03T17:54:32+5:302024-07-03T17:55:10+5:30
सुविधा केंद्राचा लाभ घ्या : आयुक्तांनी केले आवाहन
चंद्रपूर : "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा" लाभ सर्व महिलांना मिळावा यासाठी राज्य शासनाने या योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. चंद्रपूर शहरातील सर्व महिलांना योजनेचा ऑनलाइन व ऑफलाइन लाभ मिळावा यासाठी मनपातर्फे शहरात विविध पाच निःशुल्क सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या सुविधा केंद्रांचा लाभ सर्व महिलांनी घेण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.
राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलैपर्यंतच होती. मात्र, योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन या मर्यादेत आता सुधारणा करण्यात आली आहे. आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासूनचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे.
येथे भरता येणार अर्ज
योजनेच्या लाभासाठी पोर्टल, मोबाइल ॲपद्वारे अर्ज भरता येणार आहे. सेतू सुविधा केंद्र, मनपा मुख्य कार्यालय सुविधा केंद्र, मनपा झोन कार्यालये सुविधा केंद्र, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय (बीपीएल ऑफिस), सरकारी दवाखान्यामागे, कस्तुरबा रोड ज्युबली शाळेसमोर या सुविधा केंद्रांवर प्रत्यक्ष अर्ज करता येणार आहे.
येथे करा संपर्क
अर्ज भरताना काही समस्या असल्यास मनपाने सुविधा केंद्र स्थापन केले आहे. त्यासाठी संपर्क क्रमांक ७७७००१५६६३ तसेच महिला हेल्प लाइन क्र. १८१ वर संपर्क करता येईल.