लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा
By Admin | Published: January 10, 2016 01:02 AM2016-01-10T01:02:43+5:302016-01-10T01:02:43+5:30
येथील चांदा क्लब ग्राऊंडवर साकारलेल्या चित्रकुट धामात शनिवारी श्रीराम कथेच्या तिसऱ्या दिवशी 'सीता-राम’चा गजर झाला.
आठवणीतील सोहळा : भाविकांच्या उत्साहाने दुमदुमले चित्रकूट धाम
चंद्रपूर : येथील चांदा क्लब ग्राऊंडवर साकारलेल्या चित्रकुट धामात शनिवारी श्रीराम कथेच्या तिसऱ्या दिवशी 'सीता-राम’चा गजर झाला. या गजरातच सीता स्वयंवराच्या निरुपणात त्यांचा सोहळाही जीवंत झाला. ‘लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा’ च्या मंगल सुरांत भाविकांनी हा देखणा सोहळा याची देही याची डोळा पाहिला.
आपल्या प्रवचनाचे तिसरे पुष्प गुंफताना पूज्य आचार्य स्वामी गोंविददेव गिरी महाराजांनी राम नामाचा महिमा सांगितला. त्यावेळी भाविक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
जीवनाच्या उद्धारासाठी मंत्र-ग्रंथांचे पारायण झालेच पाहिजे, असे नव्हे तर राम नामावरील निष्ठा किंचीतही ढळता कामा नये. राम नामावरील आपली निष्ठा आणि श्रध्दा नि:शंक आणि कायम ठेवा, असा हितोपदेश आज महाराजांनी भाविकांना दिला.
महाराजांनी दशरथ राजे आणि त्यांच्या चारही चिरंजीवांची नावं तसेच कामांविषयी सविस्तर वर्णन केले. राम नामाचा महिमा सांगताना महाराजांनी बियाण्याचे उदाहरण दिले. बी जमिनीत कसेही पेरा ते अंकुरतेच. त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामाचे नाम शुध्द-अशुध्द स्वरुपातही घेतले तरी ते मोक्षमागाला नेणारेच ठरते. राम नामच जीवनाचा आधार असल्याचे सांगत ते म्हणाले, राम नामाचे स्मरण कुठेही -कधीही होवू शकते. अंतराळातील सर्व आनंद एका समुद्रात मिसळल्यानंतर जो शुध्दोतीत बिंदू उरतो, तसे रामाचे नाम आहे. अहंकारापासून दूर राहण्याचे आवाहन करताना भाविकांना स्वामीजी म्हणाले, माणसाला कुठले ना कुठले दुर्गुण, विकार हे असतातच. पण त्यातही अहंकार हा सर्वात वाईट आहे. दैनिक यजमान मांगलिक कुटूंबियांसह महापौर राखी कंचलार्वार, आमदार शोभाताई फडणवीस, आ.नाना श्यामकुळे यांनी महाराजांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)