जिल्हा परिषद शाळांमध्ये आता ‘लेक शिकवा’ अभियान
By admin | Published: January 7, 2017 12:48 AM2017-01-07T00:48:08+5:302017-01-07T00:48:08+5:30
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी राज्य शासनाकडून आता ‘लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येणार आहे.
शासनाचा पुढाकार : विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रम
सिंदेवाही : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी राज्य शासनाकडून आता ‘लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. यातून मुलींमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण करण्यात येणार असून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
‘विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ, अशा धनातून विचारसाठा जयापाशी आहे, तोच खरा धनवान’ अशा शब्दात शिक्षणाचे महत्त्व सांगून स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी अहोरात्र कार्य केले. त्या काळात परांपरेच्या विळख्यात गुरफुटलेल्या समाजात स्त्रीकडे तुच्छ व उपभोग्य वस्तु म्हणून पाहिले जात होते. अशा काळात समाजाची वक्रदृष्टी स्वीकारून स्त्रीयांना चुल व मूल यातून बाहेर काढण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून सामाजिक परिवर्तन चळवळीचा पाया घातला. सावित्रीबाई यांच्या महान शैक्षणिक कार्याची ओळख शाळातील विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी, यासाठी राज्यातील सर्व शाळांमधून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक शिकवा’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान ३ ते २६ जानेवारी या कालावधीत शिक्षण विभागाकडून राबविण्यात येणार आहे. बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षण देण्याची कायदेशीर तरतूद करण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यानुसार मुलींना शिक्षण घेण्याकरिता गती दिली जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)
विविध उपक्रम
मुलींच्या शिक्षण गुणात्मक दर्जाचे, शिक्षणात खंड पडू नये, शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, स्थलांतरित पालकांच्या मुलींच्या अखंडीत शिक्षणाची हमी देणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे.