तलाव सौंदर्यीकरणाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:12 PM2018-05-14T23:12:31+5:302018-05-14T23:13:06+5:30
येथे तीन मोठे तलाव असून उन्हाळ्यातही येथे मुबलक पाणी असते. परंतु, एकाही तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. यापैकी दोन मोठ्या तलावावर नौकायानची व्यवस्था केल्यास ब्रह्मपुरीकरांंसाठी ‘सोने पे सुहागा’ असा आनंद भविष्यात उपभोगता येऊ शकते.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : येथे तीन मोठे तलाव असून उन्हाळ्यातही येथे मुबलक पाणी असते. परंतु, एकाही तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. यापैकी दोन मोठ्या तलावावर नौकायानची व्यवस्था केल्यास ब्रह्मपुरीकरांंसाठी ‘सोने पे सुहागा’ असा आनंद भविष्यात उपभोगता येऊ शकते. परंतु, त्या दृष्टीने वाटचाल नसल्याने नौकायानच्या प्रतिक्षेत असल्याची भावना ब्रह्मपुरीकर व्यक्त करीत आहेत.
कोट तलाव (शुक्रवारी तलाव), बारई तलाव व लेंडारी तलाव असे ब्रह्मपुरी शहरात तीन मोठे तलाव आहेत. या तलावात पाणी संचयनाशिवाय दुसरे कोणतेही कार्य होताना दिसत नाही. यापैकी कोट तलावाच्या सौंदर्यीकरणाला मोठ्या धुमधड्याक्यात सुरुवात करण्यात आली. मात्र तेवढ्याच धुमधडाक्यात कामही बंद पडल्याचे चित्र दिसून येत आहे. कोट तलावाचे सौंदर्यीकरण हे ब्रह्मपुरीकरांसाठी आनंदाची पर्वणी होती. पण ही पर्वणी हवेत विरली. मात्र कोट तलावावर अजूनही पैसे खर्च केले जात आहेत. लाकूड लावणे व पायऱ्या तयार करुन त्यावर बैठक व्यवस्था निर्माण केली जात आहे. परंतु, या कामाची जो तो आपल्यापरीने विल्हेवाट लावत असल्याने कामाचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे. या सर्व बाबींवरुन या तलावाचे सौंदर्यीकरण आजपर्यंत पूर्ण झाले असते तर या उन्हाळ्यात पर्यटकांना व नागरिकांना नौका विहाराची हौस पूर्ण करता आली असती.
बारई तलाव खासगी
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले बारई तलाव हे खाजगी मालकीचे असल्याने येथे नौकायानची सध्या तरी हौस पूर्ण करता येणार नाही. परंतु, बारई तलावामुळे ब्रह्मपुरी शहरातील विहिरींची पाण्याची पातळी कायम टिकून असते.
लेंडारी तलावही सुशोभीत
लेंडारी तलावावरही किनाऱ्यावर पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. मात्र या ठिकाणी कुणीही फिरतक नाही. त्यामुळे नगरपरिषदेने केलेला खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येते.
बगिच्याच्या मागणीकडे दुर्लक्ष
अनेक नागरिक फिरण्यासाठी घराच्या बाहेर पडतात. सध्या शहरात हुतात्मा स्मारक बगिचा व शेषनगर बगीचा सुसज्य आहेत. या बगिच्यात ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची गर्दी असते. मात्र मागणी करुनही खेळणे व अन्य सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे.