बनावट दस्तावेजाच्या आधारे जमिनीचे केले फेरफार

By admin | Published: November 29, 2015 01:58 AM2015-11-29T01:58:46+5:302015-11-29T01:58:46+5:30

गुंजेवाही येथील तलाठी साजा क्र. १९ अंतर्गत येत असलेल्या खैरी (चक) येथील हरी डोमा कटकवार यांच्या वाटपात मिळालेल्या त्यांच्या मालकीची ...

Land deformed based on fake documents | बनावट दस्तावेजाच्या आधारे जमिनीचे केले फेरफार

बनावट दस्तावेजाच्या आधारे जमिनीचे केले फेरफार

Next

संघटनेची मागणी : तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करा
गुंजेवाही : गुंजेवाही येथील तलाठी साजा क्र. १९ अंतर्गत येत असलेल्या खैरी (चक) येथील हरी डोमा कटकवार यांच्या वाटपात मिळालेल्या त्यांच्या मालकीची गट क्र. २१८ सशर्त भोगवट वर्ग २ व आराजी ०.९१ हे.आर. या जागेची (जमिनीचे) बनावट दस्तावेज तयार करून फेरफार करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यासोबत संगनमत करून नोटीसवर संबंधिताची सही न घेता ती देणाऱ्या संबंधित महसूल विभागाच्या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार उन्मुलन संघटनेने वरिष्ठ स्तरावर केलेल्या तक्रारीत केली आहे.
हरी डोमा कटकवार यांना सन १९६६ मध्ये सशर्त भूमिधारी हक्कावर वाटपात ०.९१ आर. जमीन मिळाली होती. या जमिनीच्या हस्तांतरणावर निर्बंध असल्यामुळे या जमिनीचे हस्तांतरण व्हायला नको होते. परंतु परिस्थिती हलाकीची असल्याने ते दुसऱ्याला ठेका पद्धतीने शेती देत होते. ते अंदाजे सात-आठ वर्षाअगोदर मरण पावले. त्यांचा वारस म्हणून मुलगी असताना गुंजेवाही येथील मारोती हरी गुरनुले यांनी गुंजेवाही येथील दलालाच्या मार्फतीने तत्कालीन तलाठी पि.के. शेंडे व तत्कालीन मंडल अधिकारी वाय.एच. चांदेकर यांना हाताशी धरून ती जमीन आपल्या ताब्यात घेतली. काही दिवसातच तहसिलदार सिंदेवाही यांना ६ डिसेंबर २०१० ला हरी डोमा कटकवार याने मागील ३५ वर्षापासून पत्ता नसल्याने, वारसदार मुलगी असतानासुद्धा माझ्या कब्जात असलेल्या जमिनीच्या रेकार्डवर भोगवटदार म्हणून नाव चढवण्यासाठी अर्ज सादर केला. तेव्हा तलाठी यांनी प्रकरणाची गावात शहानिशा न करता त्यांनी दिलेल्या दलालाकरवी अर्जाचा स्वीकार करून ९/१२ ची नोटीस काढून हरी डोमा कडकवार यांची सही न घेता परस्पर साक्षदारांच्या सह्या घेतल्या. ५ जानेवारी १९९६ च्या २० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर बनावट सही करून पंच म्हणून काही लोकांच्या सह्या घेतल्या.
तलाठी यांनी अर्ज व बनावट स्टॅम्पच्या आधारे वाटपात मिळालेल्या जमिनीचा २१ डिसेंबर २०१० ला फेरफार नोंद वहीवर खोडतोड करून २१ जानेवारी २०११ अशी फेरफारवर नोंद घेतली व मंडल अधिकारी यांनी कागद पत्राची तपासणी न करता ९/१२ च्या नोटीसावर कटकवार यांची सही नसताना २० रुपयाच्या बक्षीस पत्राच्या आधारे देणार-घेणार हाजर असून बक्षीस पत्र लिहून दिल्याचे कबूल करुन ४ फेब्रुवारी २०११ ला फेरफारची नोंद केली. याबाबत संघटनेकडे तक्रार प्राप्त होताच संपूर्ण दस्ताऐवज माहितीच्या अधिकारात मागून वरिष्ठ स्तरावर तक्रार केली. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त नागपूर यांनी २४ नोव्हेंबर २०१४, जिल्हाधिकारी १४ जानेवारी २०१५ व उपविभागीय अधिकारी चिमूर यांना चौकशी करून कारवाई करावी असे पत्र देण्यात आले. त्या पत्रावर मुख्य सचिव व सचिव, महसुल व वनविभाग मुंबई यांच्या संदर्भाचा उल्लेख केला असतानासुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही. तसेच तहसीलदार सिंदेवाही यांच्या सोबत या गंभीर प्रकरणाबाबत सतरा ते अठरा वेळा मौखिक चर्चा करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा व जमिनीचा फेरफार रद्द करून वरिष्ठ स्तरावर देण्यात येणारी प्रत करून द्यावी, असे वारंवार सुचविले असतानासुद्धा त्या प्रकरणाची पूर्ण चौकशी होवूनही संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे व वरिष्ठांच्या पत्राला केरांची टोपली दाखविली जात आहे.
संघटनेने वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा महसूल विभागाने अशा प्रकारे वरिष्ठांची दिशाभूल करून अटी शर्तींचा भंग करणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर चौकशी अंती कोणत्याच प्रकारची कारवाई केलेली नाही. संपूर्ण रेकार्ड ताब्यात घेऊन संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.(वार्ताहर)

Web Title: Land deformed based on fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.