भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 10:34 PM2018-10-10T22:34:32+5:302018-10-10T22:35:34+5:30
उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बल्लारपूर येथे भोंगळ कारभार सुरू आहे. वारसान नोंद फेरफारसाठी सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरीही नोंद घेण्यास अधिकारी असमर्थता दर्शवित असल्याने या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बल्लारपूर येथे भोंगळ कारभार सुरू आहे. वारसान नोंद फेरफारसाठी सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरीही नोंद घेण्यास अधिकारी असमर्थता दर्शवित असल्याने या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कोठारी येथील आशाबाई पेटकुले यांनी सहा महिन्यांपूर्वी आई - वडील मरण पावल्यानंतर वारसान नोंद फेरफारसाठी अर्ज केला होता. यासाठी त्या सतत सहा महिन्यांपासून भूमी अभिलेख कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. मात्र त्यांच्या प्रकरणात कुठल्याही त्रुटी नसतानाही वारसान नोंद घेण्यात आली नाही. या कार्यालयात बल्लारपूर शहर व ग्रामीण भागातील जनता मोजणी, वारसान फेरफार, विक्री नोंदी घेण्यासाठी अर्ज करीत असतात. मात्र नागरिकांच्या अर्जावर योग्य तो निर्णय घेवून निकाली काढणे आवश्यक असताना त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. या कार्यालयात शेकडो प्रकरणे प्रलंबित असून कामचुकार कर्मचाऱ्यामुळे जनता त्रस्त झाली आहे.
या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कुणाचाही वचक नसून सध्या कार्यरत असलेल्या उपअधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे काम होत आहे. आपल्या अर्जाचे काम झाले का, याकरिता विचारणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना योग्य माहिती दिली जात नाही व उद्धटपणे बोलून हाकलून लावले जाते.
काही कर्मचारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना चिरीमिरीची मागणी करून सतावत असतात. विविध कामासाठी व फेरफार, मोजणीचे अर्ज लवकरच निकाली काढून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची नोंद घेवून सैरावैरा सुटलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रतिबंध घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
कार्यालयातील काही कर्मचारी आपण सूचविलेल्या कामाकडे दुर्लक्ष असतात. आपणाकडे बल्लारपूर व पोंभुर्णा या तालुक्याचा प्रभार असल्याने दोन्हीकडे लक्ष द्यावे लागते. मात्र फेरफारचे काम ज्यांच्याकडे सोपविले होते, ते निष्क्रीय असल्याने त्यांचे वेतन थांबवून त्याचा प्रभार दुसऱ्यास दिला आहे. जनतेचे अर्ज लवकरच निकाली काढून व विस्कटलेला कारभार नियमित करणार.
-एस. टी. वाकटी, उपअधीक्षक
भूमी अभिलेख बल्लारपूर.