चंद्रपूर जिल्ह्यातील लॉयड मेटल्सच्या प्रदूषणामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे सर्व्हेक्षणातून स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 09:59 AM2017-12-18T09:59:02+5:302017-12-18T10:02:07+5:30

चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथील लॉयड स्टिल मेटल्स या कारखान्यातील प्रदूषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्व्हेक्षणातून आता स्पष्ट झाले आहे.

large loss of crops due to Lloyd Metals in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यातील लॉयड मेटल्सच्या प्रदूषणामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे सर्व्हेक्षणातून स्पष्ट

चंद्रपूर जिल्ह्यातील लॉयड मेटल्सच्या प्रदूषणामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे सर्व्हेक्षणातून स्पष्ट

Next
ठळक मुद्देआरोग्यावरही परिणाम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्वेक्षण

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथील लॉयड स्टिल मेटल्स या कारखान्यातील प्रदूषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्व्हेक्षणातून आता स्पष्ट झाले आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे पदाधिकारी महेश मेंढे यांनी याबाबत तक्रार करून पाठपुरावा केला होता. नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नांमध्येही हा मुद्दा उचलून धरण्यात आला होता, हे विशेष.
लायड मेटल्स हा कच्चे लोखंड तयार करण्याचा कारखाना आहे. सदर कारखान्यामधील प्रदूषणाने उसगाव व लगतच्या परिसरातील शेतपिकांचे नुकसान होत आहे. नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. पांढरे सोने म्हणून संबोधल्या जाणारा कापूस झाडावरच काळा होत आहे. त्यामुळे या कापसाला व्यापाऱ्यांकडून मागणी नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. प्रदूषणामुळे या भागातील उत्पादनही निम्यावर आलेले आहे. सपीक जमीन नापीक झालेली आहे. यामुळे परिसरातील शेती हळूहळू उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे पदाधिकारी महेश मेंढे यांनी याबाबत जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर नागपुरात सुरू असलेल्या अधिवेशनात तारांकित प्रश्नांमध्ये या विषयांवरून सरकारला जाब विचारण्यात आला होता. त्याची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे, क्षेत्र अधिकारी प्रकाश धुमाळ, सुरेंद्र कारनकर, उसगावच्या सरपंच निकिता ठाकरे, उपसरपंच माया जुमनाके व ग्रामस्थ यांनी संयुक्तपाणे उसेगाव व परिसरातील गावांमध्ये जाऊन पाहणी केली. शिवार व पिकांची पाहणी केली. तेव्हा महेश मेंढे यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे त्यांनाही आढळून आले. लॉयड मेटल्स या कारखान्यातील प्रदूषणामुळे शेतपिकांचे, नागरिकांच्या आरोग्याचे, शेतजमिनीचे व पाण्याच्या स्रोतांचे नुकसान होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या सर्व्हेक्षण अहवालात नमूद केले आहे.


सोमवारी नागपुरात बैठक
लॉयड स्टिल मेटल्स घुग्घूस या कंपनीचे प्रदूषण व शेतकऱ्यांचे, ग्रामस्थांचे होणारे नुकसान या संदर्भात चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे उपसभापती यांनी १८ डिसेंबरला तातडीची बैठक बोलाविली आहे. विधानपरिषदेच्या दालन क्रमांक २ मध्ये ही बैठक होणार आहे. पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लॉयड मेटल्सचे महाव्यवस्थापक हे या बैठकीत उपस्थित राहणार आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होणार आहे.

Web Title: large loss of crops due to Lloyd Metals in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.