ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेटपटू लपलेले
By Admin | Published: November 26, 2015 12:50 AM2015-11-26T00:50:28+5:302015-11-26T00:50:28+5:30
ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे टॅलेंट लपलेले आहे. मात्रत्यांना बाहेर काढण्याची गरज असून यासाठी त्या प्रमाणात ...
राजकुमार चुनारकर खडसंगी
ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे टॅलेंट लपलेले आहे. मात्रत्यांना बाहेर काढण्याची गरज असून यासाठी त्या प्रमाणात वातावरण निर्मितीची गरज असून यासाठी कुणीतरी पुढे येण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तथा फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
रविवार व सोमवार सलग दोन दिवस ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी चिमूर तालुक्यातील कोलारा येथील संसारा रिसार्ट येथे मुक्कामी असताना त्यांना कोलारा गेटवर सफारी करून आल्यावर ‘लोकमत’ प्रतिनिधीने गाठले असता मनमोकळ्यापणे अनेक बाबींवर प्रकाश टाकला. मुळचा बंगलोर येथील असलेले अनिल कुंबळे म्हणाले की, क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर वेळ असल्याने व पर्यटनाची आवड असल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी आलो. ताडोबा येथील प्रकल्पात पहिल्या दिवशी वाघाचे दर्शन झाले. दुसऱ्या दिवशी वाघ मिळाले नाहीत मात्र दुसऱ्या दिवशी जंगलाचा खूप आनंद घेतला. पर्यटकांनी वाघ पाहण्यासाठीच येवू नये तर जंगलातील इतर बाबीही बघून आनंद घेण्याचा सल्लाही इतर पर्यटकांना यावेळी दिला.
माझी बंगलोर येथे पर्यावरणावर काम करणारी संस्था असून या विषयावर काम करणे मला आवडते. बंगलोर येथील पर्यटनापेक्षा महाराष्ट्रातील ताडोबा येथील पर्यटन क्षेत्र चांगले असल्याचेही कुंबळे यांनी सांगितले.
आजचा क्रिकेट खेळ फास्ट झाला आहे. त्यामुळेच टी-२० सारखे सामन्यांना प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे तर यामधूनच नवीन उद्योनमुख क्रिकेटपटूंना संधी मिळत आहे. आपल्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेट दडलेला असून त्याला संधीची गरज आहे. क्रिकेट फास्ट झाल्यामुळे कसोटी क्रिकेटची लोकप्रियता काही प्रमाणात प्रेक्षकांच्या संख्येवरुन कमी झाल्याचे दिसत असल्याचा खेद व्यक्त करीत नागपूर येथे कसोटी सामना पाहण्याच्या दृष्टीनेही मी आपल्या महाराष्ट्रात (विदर्भात) आलो आहे.
आपल्या क्रिकेट जिवनातील प्रसंग सांगतांना कुंबले म्हणाला, फिरोजशाह कोटला मैदानावर पाकिस्तान विरुद्ध मी फिरकी गोलंदाजीवर घेतलेल्या दहा बळीमुळे भारताला सामना जिंकून दिला ही माझ्या कारकीर्दीतील उत्तम कामगिरी आहे तर दसऱ्याच्या दिवशी (विजयादशमी) बंगलोर येथील होम ग्राऊंडवर आस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या एक दिवशीय सामन्यात श्रीनाथ व मी केलेली फलंदाजीतून मिळालेला विजय हा एक क्षण माझ्या कारकिर्दीतील आठवणीचा आहे.
कारण या सामन्यात माझी आई तथा श्रीनाथची आई सामना बघत होती. त्यामुळे हा सामना माझ्या जीवनात महत्त्वाचा असल्याचेही अनिल कुंबळे यांनी सांगितले.
क्रिकेटमध्ये नवनवीन बदल घडत आहेत. नवीन नवीन नियम तयार होवून क्रिकेट हा बदलत्या काळानुसार झटपट झाला आहे. या झटपट क्रिकेट (टी-२०) मुळे अनेक युवा क्रिकेटपटू पुढे येत आहेत.
त्यामुळे क्रिकेटमध्ये कसोटी, एक दिवसीय, व टी-२० असा वेगवेगळा संघाची निर्मिती करण्याकरिता चांगले क्रिकेटपटू देशात उपलब्ध होत असल्याने भारतीय क्रिकेटला चांगले दिवस असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपली क्षमता सिद्ध करावी, असेही ते म्हणाले.