पावसाने कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
By admin | Published: October 6, 2016 01:50 AM2016-10-06T01:50:11+5:302016-10-06T01:50:11+5:30
कोरपना तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे हातात आलेले कापसाचे पीक पावसामुळे पार उद्धवस्त झाले आहे.
पीक करपले : बळीराजाची चिंता पुन्हा वाढली
वनसडी : कोरपना तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे हातात आलेले कापसाचे पीक पावसामुळे पार उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे पुन्हा बळीराजाची चिंता वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसात सतत पाऊस सुरू असून पावसामुळे शेतात उभे असलेले कापूस पीक करपून गेले आहे.
शेतातील हे विदारक दृष्य पाहून आज नुकसान झालेल्या संपूर्ण शेतकरी बांधवाच्या डोळ्यात अश्रु तरारत असताना दिसते. भर उन्हात, पावसात राबराब राबून, शेतीची मशागत करुन हातात आलेल्या पिकाची अशी दुर्दशा पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी झाली. त्याना पुढे काय करायचे, असा यश प्रश्न पुन्हा बळीराजाला पडला आहे.
येथील शेतकरी प्रशांत भुसारी यांच्या शेतातील एक हेक्टरवरील कापूस पीक पूर्णपुणे सुकून गेल्याने त्यांना जबर धक्काच बसला आहे. कर्ज काढून केलेल्या शेतीची ही अवस्था पाहून त्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्याला निवेदन देऊन आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, यासाठी वनसडी येथील तलाठी यांनी नुकसान झालेल्या शेतीची लगेच पाहणी करून पंचनामे तयार केले आहे.
अठराविश्व दारिद्रय भोगणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या मात्र संपता संपत नाही. यावर्षी उशीरा मान्सुन आला असला तरी संपूर्ण शेतीतील पीके ही डौलाने उभी होती. त्यामुळे यावर्षी तरी संपूर्ण कर्ज फेडून आपण मोकळे होऊ अशी स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा निसर्गाने दगा दिले आहे. आता शासन या बळीराजाला काय मदत करते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. याची शासनाने वेळीच दखल घेऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)