पोंभुर्णा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी
By admin | Published: July 21, 2014 11:46 PM2014-07-21T23:46:56+5:302014-07-21T23:46:56+5:30
पोंभुर्णा तालुका खनिज संपत्तीने नटलेला असून या तालुक्याला अंधारी आणि वैनगंगा नदी लाभलेली आहे. परंतु पोंभुर्णा तालुक्यात वाळू माफियांचे साम्राज्य चांगलेच पसरले असून प्रशासनाच्या
देवाडा खुर्द : पोंभुर्णा तालुका खनिज संपत्तीने नटलेला असून या तालुक्याला अंधारी आणि वैनगंगा नदी लाभलेली आहे. परंतु पोंभुर्णा तालुक्यात वाळू माफियांचे साम्राज्य चांगलेच पसरले असून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून वाळूची अवैधरीत्या तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याकडे महसूल प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष व पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने दररोज शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
यंदा पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला असूनही तालुक्यात पावसाचा पत्ता नाही. दोन-तीनदा पाऊस आला. तोही रिमझीम स्वरुपाचाच होता. त्यामुळे यावर्षी वाळू माफियांचे चांगलेच फावत आहे. मागील पंधरवड्यात तर नदीचे पात्र कोरडेच होते. त्याचवेळी वाळूमाफियांकडून नदीच्या पात्रातून वाळूचा उपसा करून वाळू इतरत्र उचलून ठेवण्यात आलेली आहे. मोहाबा गावाच्या रस्त्याने, वेळवा नवेगाव मोरे या रोड लगत अशा अनेक ठिकाणी मोठमोठे वाळूचे ढिगारे ठेवण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.
पोंभुर्ण्यातही काही ठिकाणी बांधकामाचे नावे सांगून वाळूचीे साठेबाजी केली जात आहे. मात्र याकडे महसूल विभाग व पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे जनतेकडून बोलले जात आहे. आजच्याही स्थितीत दिवस-रात्रभर रेतीची ट्रकच्याद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे.
पोंभुर्णा येथील आंबेडकर चौकात तर पाच-दहा ट्रक उभे असलेले पाहायला मिळतात. रेतीच्या ओव्हरलोडमुळे वेळवा-पोंभुर्णा, पोंभुर्णा-चिंतलधाबा-आक्सापूर या मार्गाची दुरवस्था झालेली आहे. पोंभुर्णा-वेळवा रोडवरही मोठमोठे खड्डे पडलेले आहे. या परिसरातील जनतेला याचा परिणाम भोगावा लागत आहे. मात्र याकडे या क्षेत्राच्या लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी रस्ते बनविले जातात. परंतु अशा ओव्हरलोड वाहतुकीमुळे या रस्त्याची ऐशीतैशी होत असल्याने तालुक्यातील जनतेला याचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या तालुक्यातील रेती बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर व आंध्रातही जात असल्याची चर्चा सुरू आहे. रेतीचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे वाळुची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाळू माफियांकडून संबंधित विभागाचे हात ओले करून म्हणजेच चिरीमिरी देवून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केली जात आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर दिवसरात्र खुलेआमपणे वाळूची वाहतूक होत असूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे जनतेकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)