वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:53 AM2021-03-04T04:53:04+5:302021-03-04T04:53:04+5:30
वरोरा : तालुक्यातील खांबाडानजीक असलेल्या वाठोडा या गावी गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत तब्बल ...
वरोरा : तालुक्यातील खांबाडानजीक असलेल्या वाठोडा या गावी गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत तब्बल १७ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली.
वरोरा तालुक्यातील खांबाडा, सोईट आणि वणीमार्गे मोठ्या प्रमाणात अवैध दारूची तस्करी केली जाते. वर्धा जिल्ह्यातील एक दारू तस्कर हा दारूसाठा पुरवीत असल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीच्या आधारे वाठोडा या ठिकाणी मोठा दारूसाठा उतरविला जात असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी वाठोडा येथील एका कॅनलच्या जवळ सापळा रचला. रात्रीच्या अंधारात दोन चारचाकी वाहनांमधून दारूसाठा उतरविला जात असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दारू तस्कर पळून गेले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून ४५० पेट्या देशीदारूसह दोन वाहन, असा ऐवज जप्त केला.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूरचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक अमित क्षीरसागर, चेतन अवचट, जगन पुट्टलवार, सुदर्शन राखुंडे यांनी केली.