वेकोलि वसाहतीतील दूरसंचार कार्यालयाला अखेरची घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2016 12:48 AM2016-07-04T00:48:24+5:302016-07-04T00:48:24+5:30
वेकोलि वसाहत एकतानगर स्थित दूरसंचार कार्यालयात सेवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी जनरेटर व बॅटरीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली.
जनरेटर नादुरुस्त : बॅटरीची क्षमता कमी, ग्राहकांचे हाल
चारगाव खदान : वेकोलि वसाहत एकतानगर स्थित दूरसंचार कार्यालयात सेवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी जनरेटर व बॅटरीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मात्र गत एक महिन्यापासून जनरेटर नादुरुस्त अवस्थेत तर उपलब्ध असलेली एक बॅटरी कमी क्षमतेची असल्याने येथील दूरसंचार सेवा वारंवार खंडीत होत आहे. याचा फटका ग्राहकांसोबतच विद्यार्थ्यांना बसत असून आतापर्यंत दूरसंचार विभागाने दखल घेतली नसल्याने ग्राहकांमध्ये रोष पसरला आहे.
भद्रावती शहराच्या थोड्याच अंतरावर वेकोलि वसाहतआहे. या वसाहतीत जवळपास ५०० हून अधिक दूरसंचारचे ग्राहक होते. मात्र दूरसंचारच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांची संख्या कमी होवून १४० वर आली आहे. ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असताना सुद्धा दूरसंचार विभागा सेवेत सुधारणा करायला तयार नाही. या प्रकारावरून अधिकाऱ्यांचा ग्राहकांशी काहीच देणे-घेणे नाही, असेच दिसून येते.
वीज सेवा कधीही खंडीत होत असते. कधी रात्रभर तर कधी कितीही वेळ वीज पुरवठा बंद असते. विद्युत सेवा बंद पडली की, मोबाईल, ब्रॉडबॅण्ड व एक्स्चेंज या सेवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी जनरेटरची व बॅटरीची व्यवस्था केलेली असते.
एकतानगर वसाहतीतील दुरसंचार केंद्रात जनरेटर व बॅटरीची व्यवस्था आहे. मात्र २३ जूनपासून जनरेटर नादुुरुस्त स्थितीत असून बॅटरीची क्षमता कमी आहे. बॅटरीवर सेवा सुरु करण्यासाठी ५४ व्होल्टेज लागतो. मात्र एक तास बॅटरी चालली की ४७ ते ४८ व्होल्टेज येतो, तर ४० वरती सेवा बंद पडते. जनरेटर बंद असल्यामुळे येथे दोन बॅटऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र याकडे कोणताही अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही. परिणामी ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)
कर्मचारी म्हणतात, अधिकारी लक्ष देत नाहीत
याबाबत मेकॅनिकल गुरूनुले यांची विचारणा केली असता, ग्राहक माझ्याकडे तक्रारी घेऊन येतात, मला बोलतात. मात्र माझ्या हातात काहीच नाही. याबाबत मी वरिष्ठांकडे सतत समस्या मांडतो. मात्र वरिष्ठ अधिकरी लक्ष द्यायला तयार नाही, असे सांगितले. तर उपअभियंता पाडेवार यांची विचारणा केली असता, आयुध निर्माणी, भद्रावती, माजरी व एकता नगर येथे जनरेटर व बॅटरीची आवश्यकता आहे. नादुरुस्त असलेले जनरेटर बदलवून देण्याची आमची मागणी आहे. मात्र या कामाला वेळ लागेल, असे सांगितले.