विद्यार्थ्यांच्या भविष्यावर रंगला शेवटचा दिवस
By admin | Published: January 6, 2016 01:26 AM2016-01-06T01:26:21+5:302016-01-06T01:26:21+5:30
ब्रह्मपुरी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांच्या भविष्यावर चर्चासत्राने रंगविला गेल्याने महोत्सवात सर्व घटकांना न्याय मिळाल्याचा सूर उमटत होता.
ब्रह्मपुरी महोत्सव : विविध विषयांवर व्याख्यान
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांच्या भविष्यावर चर्चासत्राने रंगविला गेल्याने महोत्सवात सर्व घटकांना न्याय मिळाल्याचा सूर उमटत होता.
महोत्सवात विविध घटकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याविषयी सातत्याने प्रयत्न करत असताना विद्यार्थी व्यवसाय व मार्गदर्शन चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजू मुनघाटे होते. उद्घाटक म्हणून आमदार विजय वडेट्टीवार, प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, प्राचार्य डॉ. अमिर धम्माणी, प्रा. देवेश कांबळे, प्राचार्य देविदास जगनाडे यांची उपस्थिती होती. त्यांनी हजारोच्या संख्येत जमलेल्या युवकांना मार्गदर्शन करुन भविष्यासाठी शुभचिंतले. दुसऱ्या सत्रात करीयर मार्गदर्शनात आर्कीटेक्चर संजय नखाते यांनी ‘यहॉ के हम सिंकदर’ विषयावर अप्रतिम व्याख्यान केले. मनोज सालेकर यांनी ‘राष्ट्र निर्माण मे युवा शक्ती का योगदान’ विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत देशसेवेचे धडे दिल्याने युवकांना स्वत:वरचे प्रेम व देशावरचे प्रेम वाढविण्यास भाग पाडल्याचे दिसून येत होते.
माईंडगुरु सोनिया दाजा यांनी आपल्या ओजस्वी प्रेझेंन्टेशनने मुला-मुलींच्या अंतरमनात हात घातला. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी असंख्य उपस्थित विद्यार्थ्यांना दहा जनरल नॉलेजचे प्रश्न विचारुन त्यांना बक्षिस देऊन गौरविले.
दुपारी चार वाजताच्या सुमारास प्रिती कऱ्हाडे, साधना केळझरकर व शिला चरपटे या लोकमत सखी मंचच्या चमूने फॅशन शो, ब्रह्मपुरी सुंदरी व मिस ब्रह्मपुरी स्पर्धा घेऊन युवती व महिला मध्ये नवचेतना निर्माण केली. या महोत्सवात ‘न भूतो न भविष्य’ अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची रेलचेल पाहून ब्रह्मपुरी महोत्सव खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याची परिसरात बोलकी प्रतिक्रीया उमटताना दिसून येत होती. (तालुका प्रतिनिधी)
चर्चासत्रात महाविद्यालयांचा व शाळांचा सहभाग
महोत्सवात युवकांसाठी दोन चर्चासत्र घडवून आणले होते. त्यामध्ये ख्रिस्तानंद स्कूल, नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, मदनगोपाल भैया पब्लिक स्कूल, लोकमान्य टिळक विद्यालयाचे हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.
७३ स्टॉलवर प्रचंड गर्दी
महोत्सवादरम्यान शगून इंवेट नागपूरचे गोविंद राठी यांनी ७३ स्टॉल उभे करुन प्रदर्शनीचे आयोजन केले होते. त्यापैकी बऱ्याच स्टॉलवर विद्यार्थ्यांची गर्दी उसळून वाहत होती.
बीफार्म व डीफार्मच्या विद्यार्थ्याचे योगदान
महाराष्ट्र टेक्निकल इंस्टिट्युटचे बेटाळा येथील डीफार्म व बीफार्मच्या विद्यार्थ्यांनी सलग चार दिवस नि:शुल्क शुगर, बीपी, रक्तगट तपासणी करुन रुग्णांच्या प्रती सेवा देऊन समाजहित साधल्याचे गर्दीवरुन दिसून येत होते.