माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांना अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:39 AM2019-08-25T00:39:31+5:302019-08-25T00:41:19+5:30
प्रभारकरराव मामुलकर यांचे पार्थिव सकाळी ९ वाजतापासून अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. असंख्य चाहत्यांनी आपल्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेतले. दुपारी ३ वाजता त्यांचा अखेरचा प्रवास सुरू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी तीन वाजता स्थानिक शिवाजी स्टेडियमच्या प्रांगणात अग्निसंस्कार करून अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी सर्व राजकीय पक्षातील नेतेमंडळींसह हजारो नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, श्रद्धांजली सभा घेण्यात आली.
प्रभारकरराव मामुलकर यांचे पार्थिव सकाळी ९ वाजतापासून अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. असंख्य चाहत्यांनी आपल्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेतले. दुपारी ३ वाजता त्यांचा अखेरचा प्रवास सुरू झाला. ्त्यांच्या अंत्ययात्रेत काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी खासदार नरेश पुगलिया, आमदार अॅड. संजय धोटे, माजी आमदार सुभाष धोटे, अॅड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, देवराव भांडेकर व जैनुद्दीन जव्हेरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब वासाडे, राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, डॉ. रजनी हजारे, नंदा अल्लुरवार, राकांँचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, जिल्हा परिषद सदस्य गोदरू पाटील जुमनाके, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, व्ही. डी. मेश्राम, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुधाकर कुंदोजवार यांच्यासह नेतेमंडळी व हजारो चाहते सहभागी झाले होते.
पूर पीडितांना मदतीचा हात
माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांनी समाजसेवेचा वसा घेऊन सामाजिक व राजकीय जीवनाला प्रारंभ केला होता. तोच वारसा पुढे चालवित त्यांच्या अर्धांगिणी सुमन मामुलकर, सुधीर दौलत नलगे, अविनाश नारायण जाधव, अभिजीत बबन भुते आणि आप्तेष्टांनी गंगा पूजनाचा कार्यक्रम थोडक्यात आटोपून उर्वरित रक्कम पूरपीडितांना मदत म्हणून देण्याचे अंत्यसंस्कारानंतर जाहीर केले.