लाडक्या जवानाला अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 10:41 PM2018-11-09T22:41:50+5:302018-11-09T22:42:15+5:30

भारतीय सेनेत जम्मू-काश्मिर येथे कर्तव्यावर असताना शहरातील झिंगुजी वॉर्डातील विनोद रामदास बावणे या जवानाचा मेंदूच्या रक्तस्त्रावाने निधन झाले. या लाडक्या जवानाला शुक्रवारी साश्रु नयनानी शासकीय इतमामात स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

The last message to the stranger | लाडक्या जवानाला अखेरचा निरोप

लाडक्या जवानाला अखेरचा निरोप

Next
ठळक मुद्देशासकीय इतमामात अंत्यसंस्कार : हजारो नागरिकांनी घेतले पार्थिवाचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : भारतीय सेनेत जम्मू-काश्मिर येथे कर्तव्यावर असताना शहरातील झिंगुजी वॉर्डातील विनोद रामदास बावणे या जवानाचा मेंदूच्या रक्तस्त्रावाने निधन झाले. या लाडक्या जवानाला शुक्रवारी साश्रु नयनानी शासकीय इतमामात स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान विनोद बावणे यांच्या चितेला त्यांचा १० वर्षीय मुलगा अथर्व याने भडाग्नी देताना अनेकांना अश्रु अनावर झाले होते.
विनोद बावणे हे जम्मू सीमारेषा परिसरातील नगरोटा येथे कर्तव्यावर होते. दहा दिवसांपूर्वी अचानक रक्तदाब वाढून मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला. दरम्यान, ते बेशुद्ध झाले. उधमपूर येथील मिलीटरी कमांडो रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी ६ नोव्हेंबरला रात्री १०.५ मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी ९ वाजता शहरातील झिंगुजी वॉर्डातील घरी आणण्यात आले. पार्थीव आल्याचे कळताच शहर व तालुक्यातील शेकडो नागरिकांनी पार्थिवाच्या अत्यंदर्शनासाठी गर्दी केली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हेदेखील लगेच निवासस्थानी दाखल झाले. कुटुंबियांचे सांत्वन करून श्रद्धांजली अर्पण केली. आयुध निर्माणीतील सुरक्षा विभागातील डी.एस.सी. कमांडोज पथकाचे सुभेदार अजित सिंग गार्ड कमांडर हवालदार आलम, हवालदार रामपाल यांच्या नेतृत्वात प्रारंभी जवान विनोद बावणे यांच्या निवासस्थानी मानवंदना देण्यात आली. सकाळी १०.४५ वाजता निवास्थानातून शहरात अंत्ययात्रा निघाली. शहरातील डीपी चौक, जुना बसस्थानक, गांधी चौक, नागमंदिर, पंचायत समिती, पद्मावार, वार्डी मार्गाने अंत्ययात्रा पिंडोनी स्मशानभूमीत पोहचली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा आबाल वृद्धांनी अत्यंदर्शनासाठी एकच गर्दी केली. अंत्ययात्रेत हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी वंदे मातरम्, भारत माता की जय, अमर रहे अमर रहे, विनोद बावणे अमर रहे... या घोषणा होत होत्या. अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर जवान विनोद बावणे यांना शासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रभारी तहसीलदार मधूकर काळे, माजी सैनिक खुशाल मस्के, ठाणेदार बी.डी. मडावी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे एस. आर. शिवणकर, नागपूर कामठी येथील जवान कल्याण संघटनेचे सत्येंद्र चावरे, बी. टी. आंभोरे, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, दिलीप मांढरे, के. एस. राळे, अतुले कोले, माजी सैनिक संघटनेचे सिद्धार्थ डांगे, नगरसेवक नंदू पढाल आदींनी पुष्पचक्र वाहुन श्रध्दांजली अर्पण केली. चंद्रकांत गुंडावार यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. यावेळी केशव तिराणीक, बोभाटे व शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
बावणे कुटुंबीयांमध्ये शोककळा
जवान विनोद बावणे यांच्या पार्थिवासोबत आलेले जम्मू नगरोटा येथील भारतीय सैन्य दलाचे हवालदार पी. कुमार यांनी सुरूवातीपासून शेवटपर्यंत आपली जबाबदारी समर्थपणे पार पडली. जवान विनोदचे पार्थिव उधमपूर येथून जम्मूपर्यंत रेल्वेने तर जम्मूपासून नागरपूरपर्यंत विमानाने आणण्यात आले. त्याठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. तिथून पार्थिव शववाहिकेद्वारे त्यांच्या निवास्थानी आणण्यात आले. पार्थिवाचा प्रवास तब्बल २४ तासांपेक्षा अधिक झाल्याची माहिती हवालदार पी. कुमार यांनी दिली. मृतक विनोदच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ व दोन बहिनी असा परिवार आहे.

Web Title: The last message to the stranger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.