गोंडी भाषा मानकीकरण कार्यशाळेचे काम अंतिम टप्प्यात
By Admin | Published: November 25, 2015 03:40 AM2015-11-25T03:40:45+5:302015-11-25T03:40:45+5:30
स्थानिक राजीव गांधी कामगार भवनात सुरू असलेल्या गोंडी भाषा मानकीकरण कार्यशाळेचे काम अंतिम टप्प्यात आले
चंद्रपूर : स्थानिक राजीव गांधी कामगार भवनात सुरू असलेल्या गोंडी भाषा मानकीकरण कार्यशाळेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आजपर्यंत जवळपास तीन हजार शब्दापेक्षा जास्त शब्दाचे मानकीकरण पूर्ण झाले आहे. कार्यशाळेला देशातील विविध राज्यातून आलेल्या गोंडियन समाजातील साहित्यिक, अभ्यासक, विचारवंत व संशोधक याचा माध्यमातून काम सुरू आहे.
गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था जिवती, गोंडराजे समाज सुधारक ट्रक चंद्रपूर, सेंट्रल गोंडवाना नेट आदिवासी स्वरा भोपाल या संस्थेमार्फत २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत गोंडी भाषा मानकीकरण सहावी राष्ट्रीय कार्यशाळा चंद्रपुरात सुरू आहे. कार्यशाळेचा समारोप व खुले चर्चासत्र २५ नोव्हेंबरला दुपारी ११.३० वाजता होणार असून यावेळी गोंडियन समाजातील मान्यवर व विचारवंत उपस्थित राहून गोंडीयन समाज बांधवाना गोंडी भाषा मानाकीकरणाचे महत्त्व व पुढील वाटचालीबाबत मार्गदशन करणार आहेत.
कार्यशाळेला उपस्थित कन्नड विद्यापीठाचे विभागप्रमुख डॉ.के.एम. मैत्रेय, गोंडी साहित्यीक प्रकाश सलामे, नागोराव मरसराम, सिडाम आरजू यांच्यासह मध्यप्रदेश राज्याचे साहित्यीक गुलजार सिंह मरकाम, सुशिला धुर्वे, छत्तीसगडचे देविलाल नरोटे, नेमीलाल कुमरा, ओरीसाचे क्रिष्णा बुरडा, आनंद मडावी, तेलंगाणाचे मधूकर सिडाम, भीमराव कोटनाके, आंध्रप्रदेशचे रावण सिडाम, नंदलाल धुर्वे, महाराष्ट्राचे उषाकिरण आत्राम, मनिरावण दुगा, गोदरु पा. जुमनाके यांच्या नेतृत्त्वात चमू काम करीत आहेत. गोंडीभाषा मानकीकरण कार्यशाळेच्या माध्यमातून गोंडी भाषेचा शब्दकोष तयार करण्यात येणार आहे. लोप पावत चाललेल्या व विविध स्थानिक भाषेत संकरीत होत असलेल्या गोंडी भाषेचे जतन व संवर्धन या माध्यमातून होणार असून गोंडी भाषेला मान्यता मिळण्याच्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. कार्यशाळेला समाजबांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन धिरज शेडमाके यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)