- अन् त्याचे पाय व डोक्यावरच करावा लागला अंत्यसंस्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 05:00 AM2021-12-19T05:00:00+5:302021-12-19T05:00:43+5:30
गुरुवारी रामदास नेहमीप्रमाणे शेतावर गवत कापण्यासाठी गेला होता. गवत कापत असताना वाघाने हल्ला करून रामदासच्या नरडीचा घोट घेतला. ही घटना सायंकाळची असल्याने व अंधार झाल्याने गावकरी रामदासचा शोध घेऊ शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहिले असता, वाघाने रात्रभर शरिरातील बराच भाग खाल्ला होता. त्यात फक्त डोके व दोन पाय शिल्लक उरले होते.
राजकुमार चुनारकर
चिमूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या सोनेगाव (बेगडे) येथील देविदास गायकवाड या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात गुरुवारी मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत हल्लेखोर वाघाने रामदासच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. नातेवाईक व गावकऱ्यांच्या हाती रामदासचे फक्त पाय व डोके सापडले. त्यामुळे नागरिकांना केवळ रामदासच्या डोके व पायावरच अंत्यसंस्कार करावे लागले. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.
चिमूर तालुक्यातील अनेक गावांच्या सभोवताली ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे जंगल लागून असल्याने मांसळ, कोलारा, मदनापूर, शेडेगाव, सोनेगाव, बंदर, खडसंगी, झरी आदी गावांच्या सीमा व्याघ्र प्रकल्पालगत आहेत. त्यामुळे या गावाच्या लगत वाघांचे वास्तव्य आहे तर दोन दिवसांपूर्वी चिमूर परिसरात सकाळी फिरायला जाणाऱ्या अनेकांना वाघाचे दर्शन झाले होते. अनेक जनावरांचा वाघाकडून फडशा पाडला जात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या रामदासकडे चार-पाच एकर शेती असल्याने रामदास शेतीतूनच आपल्या परिवाराचे पालनपोषण करत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे. गुरुवारी रामदास नेहमीप्रमाणे शेतावर गवत कापण्यासाठी गेला होता. गवत कापत असताना वाघाने हल्ला करून रामदासच्या नरडीचा घोट घेतला. ही घटना सायंकाळची असल्याने व अंधार झाल्याने गावकरी रामदासचा शोध घेऊ शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहिले असता, वाघाने रात्रभर शरिरातील बराच भाग खाल्ला होता. त्यात फक्त डोके व दोन पाय शिल्लक उरले होते.
मृत्यूनंतर धर्म संस्कृतीनुसार मृताचे आप्तजन त्याला तिरडीवर नेऊन मोक्षघाटावर अंतिम संस्कार करतात. मात्र, ३९ वर्षीय रामदास गायकवाड याच्या नशिबी मात्र वेगळेच काही होते. आयुष्यातील शेवटच्या क्षणातील अंतिम विधीचे सौख्यही त्याला मिळाले नाही. नातलगांना रामदासच्या डोके व पायाचेच अंत्यसंस्कार करावे लागले. परिसरातील असा पहिलाच प्रसंग असल्याची चर्चा सध्या गावात आहे.
शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
सध्या शिवारात शेतकऱ्यांची कापूस वेचणी, गहू व चणा पेरणीचे काम सुरु आहे. मात्र, चिमूर परिसरात दोन दिवसांपूर्वी चावडी परिसरातील शेतात वाघाने डुकराची शिकार केली तर शुक्रवारी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील शिवारात वाघाने देविदास गायकवाड यांना ठार मारल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.