जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘मदतीचा एक घास’ उपक्रमाची सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:27 AM2021-05-16T04:27:25+5:302021-05-16T04:27:25+5:30
चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल्स व उपकहारगृह बंद आहेत. कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांचे जेवणासाठी हाल होत आहेत. अशांना घरचे जेवण मिळावे, ...
चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल्स व उपकहारगृह बंद आहेत. कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांचे जेवणासाठी हाल होत आहेत. अशांना घरचे जेवण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने 'मदतीचा एक घास' हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबवला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर महिला काँग्रेसच्या वतीने या अभिनव उपक्रमाची सुरवात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
महिला काँग्रेसच्या माध्यमातून रुग्णांना मदतीचा एक घास मिळत आहे. त्यातून गरजू लोकांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. महिला काँग्रेसनी कोरोनाच्या संकट काळातदेखील हा उपक्रम राबवून गरजूंची मदत घेण्याची भूमिका घेतली, ती कौतुकास्पद आहे. अनेक समाजसेवी लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले. यावेळी २५० जेवणांचे डब्बे वितरित करण्यात आले. पुढील दोन आठवडे हा उपक्रम सुरूच राहणार असल्याची माहिती प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी दिली आहे. या उपक्रमात माजी महापौर संगीता अमृतकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनीता धोटे, जिल्हा उपाध्यक्ष व माजी सभापती हर्षा चांदेकर, नगरसेविका ललिता रेवलीकर, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, उपाध्यक्ष उषा धांडे, बल्लारपूर तालुका अध्यक्षा अफसाना साय्यद, बल्लारपूर शहर अध्यक्ष मेघा भाले, शहर सचिव वाणी डारला, स्वाती त्रिवेदी, सुनंदा धोबे, कल्पना गिरडकर, शांती घुगलक, लता बारापत्रे आदी उपस्थित होते.