लक्ष्मणदादा अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 11:54 PM2018-04-09T23:54:14+5:302018-04-09T23:54:14+5:30
भूवैकुंठ अड्याळ टेकडीचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १२ वाजता भूवैकूंठाच्या भूमीत हजारोच्या गुरुदेवभक्तांच्या उपस्थितीत अत्यंसस्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : भूवैकुंठ अड्याळ टेकडीचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १२ वाजता भूवैकूंठाच्या भूमीत हजारोच्या गुरुदेवभक्तांच्या उपस्थितीत अत्यंसस्कार करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील आत्मानुसंधान भू-वैकूंठ अड्याळ टेकडीचे उत्तराधिकारी आचार्य लक्ष्मणदादा नारखेडे यांचे रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर हजारो गुरुदेवभक्ताच्या साक्षीने सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दादांच्या संतकुटीमधून त्यांचे पार्थिव ग्रामगिता व्यासपिठावर आणण्यात आले. त्यानंतर तेथे त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. हजारो गुरुदेव भक्तासमवेत दादांचे पार्थिव अड्याळ टेकडीतील तुकारामदादांच्या समाधीला प्रदक्षिणा घालून टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या शिवारात भजन, दिंडीसह नेण्यात आला.
दुपारी १ वाजताच्या सामूहिक प्रार्थना करून दादांचे पुत्र सुभाष नारखेडे, अरुण नारखेडे व मुलगी उषा नारखेडे यांच्या हस्ते चिताग्नी देण्यात आली. यावेळी वेळूरकर गुरुजी (नांदुरा), नाना महाराज (परसवाडा), चैतन्य महाराज (कांडली), मिलींद येवले, ज्ञानेश्वर रक्षक, जनार्धन बथे, चंदू पाटील मारकवार, डॉ. भाऊ थुटे, गुलाब महाराज, पोलीस निरीक्षक विलास चव्हाण, गादेवार (नांदेड), सेवक मिलमिले, रवी मानव, सुबोधदादा, डॉ. एन.एस. कोकोडे, मिलींद सुपले, अॅड. गोविंद भेंडारकर, नामदेव लोजेवार, क्रिष्णा सहारे, डॉ. कुंभारे, प्रा. वरूडकर, माणिकदादा बेलोरकर, श्यामराव मोहुर्ले यांच्यासह बहुसंख्य नागरिक आणि भगिनी उपस्थित होते.
विविध भागातून गुरुदेवभक्त दाखल
लक्ष्मणदादांच्या अंतिम संस्कारासाठी नांदेड, नांदुरा, मोझरी, अमरावती, आंध्रप्रदेश, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व अन्य ठिकाणावरून अनेक गुरुदेवभक्त आले होते. दादांच्या अंतिम संस्कारासाठी ग्रामसंरक्षण दल चोरटी, अड्याळ, लाखापूर यांनी व्यवस्था पूर्णपणे चोख हाताळली होती.