चार गावांमध्ये पट्टेदार वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:34 AM2018-01-12T00:34:15+5:302018-01-12T00:34:34+5:30
मागील काही दिवसांपासून सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील चार गावांमध्ये पट्टेदार वाघाचा संचार सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
राकेश बोरकुंडवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : मागील काही दिवसांपासून सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील चार गावांमध्ये पट्टेदार वाघाचा संचार सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
सिंदेवाही वन परिक्षेत्रात बारा गावे येतात. लोनवाही, सिंदेवाही, किन्ही, मुरमाडी या चार गावांत मागील एक महिन्यांपासून पट्टेदार वाघ व बिबटाचाच संचार सुरू आहे. एक महिन्यापूर्वी तयागोंदी जंगलात वाघाने कविता निकोडे या महिलेला ठार केल्याची घटना घडली होती. दोन आठवड्यांपूर्वी लोनवाही येथील ठाकूरच्या घराजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट अडकला होता. तर किन्ही, मुरमाडी, कच्चेपार या गावात दोन महिन्यात सहा बैल, शेळ्या मारल्या. त्यामुळे दिवसेंदिवस या परिसरात वाघ व बिबट्याची दहशत पसरत आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. आठ दिवसांपूर्वी लोनवाही येथील रहिवासी पुंडलिक कावळे यांना घराजवळ दोन बिबट्यांची जोडी दिसली. लोनवाही भागात वाघांच्या पायाचे ठसे दिसले होते. परिणामी, परिसरातील नागरिकांनी वनविभागाला निवेदन देवून गावाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
सिंदेवाही देवयानी कॉन्व्हेंट, महालक्ष्मी मंदिर परिसर, इंदिरानगराील गावतलाव परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन नागरिकांना दररोज मिळत होत आहे. परिणामी, शेतकºयांना शेतावर काम करणे कठीण झाले आहे.
किन्ही, मुरमाडी गावांतील जनावरे वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली होती. या परिसरातील शेतकरी दुपारीदेखील शेतात जाण्यास घाबरतात. या परिसरात शेतकºयांनीे वांगे, टमाटर, मिरची व अन्य भाजीपाला लावला आहे. परंतु, वाघाच्या भितीने शेतावर जाणे बंद केले.
तयागोंदी जंगल परिसरात जेसीपीच्या माध्यमातुन तलाव खोलीकरणाचे काम सुरू असताना दोन पट्टेदार वाघांचे दर्शन झाले. सिंदेवाही वन परिक्षेत्रात वाघाचे दररोज दर्शन होत असल्याने जंगलात जाण्यासाठी नागरिक कचरत आहेत.
तालुक्यातील नागरिकांनी वाघाच्या संचाराबाबत वनविभागाच्या अधिकाºयांना निवेदनातून माहिती दिली. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याने अनेक शेतकºयांनी रात्रीच्या सुमारास शेतीचे रक्षण करणे सोडून दिल्याचे दिसून येत आहे.
वाघाची दहशत कायम आहे. वनविभागाने काही ठिकाणी सीसीटीव्ही तसेच पिंजरे लावले. अधिकाºयांच्या मार्गदर्शनानुसार सुरक्षेची कामे सुरू आहेत. नागरिकांनी जंगलात जाऊ नये. मदतीसाठी दोन तुकड्या तयार केल्या आहेत.
- के.आर. गोंड,
वनपरिक्षेत्रधिकारी, सिंदेवाही