डोंगरहळदी शिवारात पट्टेदार वाघाचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:07 AM2017-11-23T00:07:57+5:302017-11-23T00:08:20+5:30

डोंगरहळदी शेतशिवारामध्ये मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचे सतत दर्शन होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

Leader of the Tigers lives in the hill station | डोंगरहळदी शिवारात पट्टेदार वाघाचे वास्तव्य

डोंगरहळदी शिवारात पट्टेदार वाघाचे वास्तव्य

Next
ठळक मुद्देधास्ती : शेतकऱ्यांनी सोडली जागली

निलकंठ नैताम।
आॅनलाईन लोकमत
पोंभूर्णा : डोंगरहळदी शेतशिवारामध्ये मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचे सतत दर्शन होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. स्थानिक गुराख्यांनी वाघाची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यामुळे जंगलात जाण्यासाठी ग्रामस्थ कचरत आहेत.
पोंभूर्णा तालुक्यातील डोंगरहळदी येथील कक्ष क्र. ५२६ मध्ये घनदाट जंगल आहे. त्यामुळे पट्टेदार वाघाने या परिसरात आपले बस्तान मांडले. हा वाघ मादी प्रजातीचा असून त्याच्यासोबत छोटे दोन बछडे असल्याची माहिती गुराख्यांनी दिली. हा वाघ शिकारीसाठी शेतशिवारातील परिसरामध्ये सतत भटकत असल्याचेही गुराख्यांचे म्हणणे आहे. परिसरात वाघाचा वावर सुरू असल्याची माहिती नजिकच्या गावांमध्ये पोहोचताच ग्रामस्थ भयभित झाले आहेत. वनविभागाच्या अधिकाºयांना या घटनेची माहिती नव्हती. परंतु मागील आठवड्यात देवाडा खुर्द येथील शेतकरी रविंद्र नैताम यांची जनावरे चरण्यासाठी कक्ष क्र. ५२६ मध्ये गेले असता जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्या गाईवर झडप घेवून ठार केले. या घटनेची तक्रार शेतकºयाने वनरक्षक कावळे यांना दिली. दरम्यान, कावळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून सोमवारला पंचनामा केला. यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. सद्य:स्थितीत या परिसरामध्ये धानपिकांची कापणी व बांधणीच्या कामाला जोमात सुरुवात झाली. रानडी डुकरांपासून शेतपिकांचे नुकसान टाळण्यासाठी जिवाची पर्वा न करता परिसरातील अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये रात्रीला मचानावर बसून जागल करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या जिविताला वाघापासून धोका निर्माण होवू शकतो.

ग्रामस्थांना अभय द्यावे
देवाळा खुर्द जंगल परिसरात वाघाने गाईला ठार केल्याची घटना घडली. गुराख्यांना वाघाचे सतत दर्शन होत असल्याने ग्रामस्थांनी जंगलात जाणे बंद केले. गाय ठार झालेल्या शेतकºयास अद्याप भरपाई मिळाली नाही. त्यामुळे दहशत कायम असल्याचे दिसून येते. दरम्यान, वन विभाग आणि राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या चमुंनी या जंगलात कॅमेरे लावल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक मुकूल त्रिवेदी यांनीही दुजोरा दिला आहे.
चराई वनक्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
देवाडा खुर्द येथील परिसरामध्ये महसूल विभागाची शेकडो एकर जागा चराईसाठी राखीव ठेवण्यात आली होती. त्यामुळे देवाडा खुर्द, डोंगरहळदी, जामतुकूम, जामखुर्द, रामपूर दीक्षित, हत्तीबोडी आदी गावांतील जनावरांच्या चाºयाची समस्या सुटली होती. मात्र, काही व्यक्तींनी या क्षेत्रावर अतिक्रमण केले. तर दुसरीकडे परिसरात वाघाचा संचार सुरू झाल्याने शेतकरी व गुराख्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. हे अतिक्रम हटविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. अतिक्रमणापूर्वी चराईचा प्रश्न सुटला होता. परंतु सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी अधिकाºयांना हाताशी धरून चराईच्या जागेवर अतिक्रमण केले. शिवाय, केवळ पैशाच्या जोरावर बोगस पट्टे तयार करून त्या ठिकाणी धानपिकांची शेती करीत आहेत. त्यामुळे स्थानिक परिसरातील शेतकºयांना आपल्या जनावरांना चारण्यासाठी जंगल परिसराशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यामुळे शेतकºयांचे एखादे जनावर दगावल्यास त्यांच्या कुटुंबावर फार मोठा आघात होतो. शेती करण्याचे साधन संपुष्टात येते. पोंभूर्णा तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र अतिशय अल्प आहे. परिसरातील शेतकरी केवळ निसर्गावरच शेती करीत आहेत. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन होत नाही. परिणामी, शेतकरी कर्जाचा विळख्यात सापडला. आता परिस्थितीत जनावरांच्या चराईवरही बंधने आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

डोंगरहळदी परिसरातील कक्ष क्रं. ५२६ मध्ये वाघाने एका गाईला ठार केले होते. त्यामुळे ५२६ आणि ५१६ या दोन वनकक्षांमध्ये कॅमेरे लावण्यात आले आहे. या कॅमेरामुळे कुठलीही अनुचित घटना घडणार नाही. वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनानुसार वनविभागाकडून सहकार्य करण्यात येणार आहे.
-एस. ए. वळे, वनरक्षक, डोंगरहळदी

Web Title: Leader of the Tigers lives in the hill station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.