काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीला नेतेच अनुपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2017 12:52 AM2017-03-03T00:52:38+5:302017-03-03T00:52:38+5:30
अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या काँग्रेसच्या पराभूत
पुन्हा बैठक होणार : सर्वपक्षीय समावेशासाठी आवाहन करणार
चंद्र्रपूर : अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक अल्प उपस्थितीने आणि नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे कुठल्याही निर्णयाप्रत न येता संपली. असे असले तरी येत्या ७ मार्चला हीच बैठक आता नेत्यांच्या पुढाकारात घेण्याचे ठरले असून या बैठकीला सर्वपक्षीय स्वरूप दिले जाणार आहे.
गुरूवारी दुपारी १ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ही बैठक जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार आणि चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांनी आयोजित केली होती. मात्र बैठकीचे निमंत्रण सर्वांपर्यंत न पोहचल्याने पराभूत उमेदवारांची अपेक्षित उपस्थिती दिसली नाही. या बैठकीला दोन्ही आयोजकांसह दिनेश चिटनुरवार, डॉ. वाढई, वैशाली पुल्लावार, चित्रा डांगे, कन्हैया जयस्वाल, बापू धोटे, शेख मुसा यांच्यासह जिल्हाभरातील काँग्रसचे सुमारे २० ते २२ पराभूत सदस्य उपस्थित होते. अन्य पक्षातील काही सदस्यही उपस्थित होते. मात्र अपेक्षित उपस्थिती न दिसल्याने केवळ पराभवाच्या कारणांची चर्चा करण्यात आली. मतदान यंत्रात घोळ असल्याच्या भावना यावेळी अनेक सदस्यांनी व्यक्त केल्या. या विरोधात न्यायालयाकडे दाद मागण्याचेही मत उपस्थित सदस्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी उपस्थित एका उमेदवाराशी मोबाईलवरून संपर्क साधून आपणास न कळविता बैठक आयोजित केल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
ते बाहेरगावी असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. या नाराजीनंतर उपस्थित सदस्यांनी नव्याने बैठक आयोजित करून त्यासाठी जिल्हाध्यक्षांनीच पुढाकार घ्यावा, असे ठरविले.
त्यानुसार ही बैठक आता ७ मार्चला होण्याची शक्यता असून या बैठकीत भाजपा वगळता सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (जिल्हा प्रतिनिधी)