मर्जीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नेत्यांनी लावली फिल्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:27 AM2021-08-29T04:27:42+5:302021-08-29T04:27:42+5:30
यंदा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षण विभागाकडे ३६ प्रस्ताव आले. कला-अपंग व माध्यमिक विभागातून प्रत्येकी एका शिक्षकाने प्रस्ताव सादर केला. ...
यंदा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षण विभागाकडे ३६ प्रस्ताव आले. कला-अपंग व माध्यमिक विभागातून प्रत्येकी एका शिक्षकाने प्रस्ताव सादर केला. या दोन्ही शिक्षकांची निवड निश्चित झाली आहे. प्राथमिक विभागातील १५ पुरस्कारांसाठी स्पर्धा होणार आहे. निवडीसाठी जिप अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित आहे. समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण सभापती, शिक्षण सभापती, महिला व बालकल्याण सभापती, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, डाएटच्या प्राचार्यांचा समावेश आहे. प्राप्त प्रस्तावावर गुणांकन केल्यानंतर या समितीकडे गुणतालिका सोपविली जाते. निवड केल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविली जाते. आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या निवडीमध्येही गेल्या काही वर्षांत राजकारण सुरू झाले. लोकप्रतिनिधींकडून अनेक शिक्षकांच्या शिफारसी केल्या जात आहे. शिक्षण विभागाच्या प्रमुख या नात्याने उपाध्यक्षांना विश्वासात न घेता गतवर्षी शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड झाली होती.
१५ मुद्यांवर होणार मूल्यांकन
राज्यस्तरीय निकषांनुसार १५ मुद्यांवर गुण दिले जाणार आहेत, शैक्षणिक अर्हतेपेक्षा पुढील टप्पा, संशोधनपर निबंधाला मिळालेले पुरस्कार, वृत्तपत्रातील लेख, विद्यार्थी शिक्षकाला मिळालेले पुरस्कार, राष्ट्रीय कार्यातील प्राप्त पुरस्कार, शालेय चाचणी, वर्गातील किमान एका विद्यार्थ्याला मिळालेला क्रीडा पुरस्कार, प्रज्ञेचा शोध घेणाऱ्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण, नवप्रकल्प कार्य, विद्यार्थ्यांनी वाचलेली पुस्तके, हॅण्ड वॉशिंग सेंटर व शिक्षण हक्क कायद्यानुसार किती घटकांची पूर्तता झाली, या निकषांवर मूल्यांकन होणार आहे.