राष्ट्र निर्मितीसाठी जातींचा त्याग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:42 AM2018-03-16T00:42:04+5:302018-03-16T00:42:04+5:30
समरसत्ता हा गोंडस शब्द बहुजन समाजामध्ये रूजविल्यामुळे सहिष्णूता धोक्यात आली आहे. म्हणूनच संसदीय लोकशाही सामाजिक लोकशाहीमध्ये रुपांतर होऊ शकली नाही.
ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : समरसत्ता हा गोंडस शब्द बहुजन समाजामध्ये रूजविल्यामुळे सहिष्णूता धोक्यात आली आहे. म्हणूनच संसदीय लोकशाही सामाजिक लोकशाहीमध्ये रुपांतर होऊ शकली नाही. सशक्त राष्टÑाची निर्मिती झाली नाही. त्याकरिता मूलनिवासी बहुजन समाजाने जातीचा गर्व सोडावा, असे मत मूलनिवासी संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एम. टी. साव यांनी व्यक्त केले. मूल निवासी बहुजन एकजूट परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
बामसेफ जिल्हा शाखेच्या वतीने रविवारी रेडक्रॉस भवनात ही परिषद घेण्यात आली. या परिषदेचा विषय ‘समतामूलक समाज आणि सशक्त राष्ट्र निर्मितीसाठी फक्त मूलनिवासी बहुजन समाजाची एकजूट अनिवार्य आहे’ असा होता. परिषदेचे उद्घाटन तैलिक महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव फंड यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. राजेंद्र जेनेकर, अल्पसंख्याक संघटनेचे शेख अब्दुल वहाब, सूर्यकांत झाडे, प्रसिद्ध लेखक अशोक पवार, सतीश मालेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. जातीय विभाजनाने बहुसंख्याक असलेला बहुजन समाज अल्पसंख्याक झाला. याचा गैरफायदा शोषक समाजव्यवस्था घेत आहे. धर्म संरक्षणाच्या नावाखाली जातींचा वापर करण्याचे प्रकार वाढले. त्यामुळे मूलनिवासी ही संकल्पना स्वीकारून सर्व समाजातील नागरिकांनी प्रबोधनासाठी पुढे यावे, असा सूर या परिषदेत उमटला. लोकशाहीर दादाजी वाघमारे खुशाल साव, निर्विकार खोब्रागडे यांनी स्फूर्तीगीते सादर केलीत. प्रास्ताविक के. के. शेंडे तर संचालन पंकज जांगडेकर यांनी केले. यावेळी जी. के. उपरे, सेवकदास बरके, नरेंद्र गोस्वामी, ताराचंद भसारकर, एकनाथ साव, सुभाष गेडाम आदी उपस्थित होते.