५०० मजुरांना वेशीवर सोडून चंद्रपूर जिल्हा प्रशासन झाले मोकळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 02:42 PM2020-05-04T14:42:19+5:302020-05-04T14:42:45+5:30
कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यात, परराज्यात गेलेले काही मजूर परत आले तर काहींना प्रशासनाने परत आणले. आणून त्यांना गावाच्या तीन किमी अंतरावर क्वारंटाईन करून ठेवले. एवढ्यावरच प्रशासन थांबले. त्यांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही.
शंकर चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले. याचा सर्वाधिक फटका जिवती तालुक्यातील मजुरांना बसला आहे. कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यात, परराज्यात गेलेले काही मजूर परत आले तर काहींना प्रशासनाने परत आणले. आणून त्यांना गावाच्या तीन किमी अंतरावर क्वारंटाईन करून ठेवले. एवढ्यावरच प्रशासन थांबले. त्यांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. क्वारंटाईनचे १४ दिवस जणू एखादी शिक्षाच हे मजूर भोगत आहे की काय, अशी भिषण परिस्थितीत ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आली.
तालुक्यातील मालगुडा व इतर भागातील मोठ्या संख्येने मजूर रोजगारासाठी लातूर जिल्ह्यात गेले होते. मात्र कोरोनाचा हाहाकार माजला आणि कामधंदा बाजुला राहिला. दिवसभर काम करून प्रपंच भागविण्यासाठी हे मजूर इच्छा नसतानाही गाव सोडून गेले. मनात विविध स्वप्न बाळगून कुठल्याही सोयी-सुविधा नसताना श्रमाची कामे करून सुखी जीवन जगणाऱ्या या मजुरांना कोरोनाची लागण तर झाली नाही. मात्र कोरोनाचा अप्रत्यक्ष मार बसला आहे. लॉकडाऊनमुळे कारखान्याचा पट्टा पडला. घरी येण्याची घाई त्यात कोरोनाचे संकट. महिनाभर लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात एका शेतात कारखानदाराच्या आधारावर दिवस काढले. हाताला काम नसल्याने जवळ असलेले पैसेही संपून गेले. शासनाने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना स्वगावी पोहोचविण्याचे आदेश काढले. हातात दमडीही नसताना हिमतीने गाव गाठले. आरोग्य तपासणीही झाली. चौदा दिवस गावापासून तीन किमी अंतरावर असलेल्या दमपूर मोहदा येथील आश्रमशाळेत त्यांना क्वारंटाईन करून प्रशासन मोकळे झाले. ग्रामस्थ कशीबशी पोट भरण्यासाठी भाजीभाकरी देतात. मालगुडयातील ९० च्या जवळपास महिला-पुरूष मजूर व त्यांच्या सोबतीला असलेली त्यांची मुलेही नशिबाचे हे भोग भोगत आहेत. आधी महिनाभर लातूर जिल्ह्यात आणि १४ दिवस येथे विनाकारण बसून राहावे लागत असल्याने आता या मजुरांना मुलाबाळांच्यापोषणाची चिंता सतावत आहे. उन्हाळाभर लातूर जिल्ह्यात काम करून पदरात काही पैसे जमा होईल, असे या मजुरांना वाटत होते. मात्र तसे झाले नाही.
स्थलांतरित मजुरांचा परतीचा ओघ सुरूच
तालुक्यातून कामाच्या शोधात मजूर तेलंगणा राज्यातील खमम जिल्ह्यात मिरची तोडण्यासाठी तर काही मजूर ऊस तोडण्यासाठी गेले होते. आतापर्यंत तालुक्यात अठराशे मजूर स्वगावी पोहोचले असून तेराशे मजुरांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. आणखी ५०९ नागरिक अजूनही ठिकठिकाणी क्वारंटाईनमध्ये भोग भोगत आहेत.
प्रस्तुत प्रतिनिधीने येथे क्वारंटाईन असलेल्या पांडुरंग तुकाराम आडे या मजुराला विचारणा केली असता गेल्या दीड महिन्यापासून आम्ही बसूनच असल्याने संसाराचा गाडा चालविणे कठीण जाणार असल्याचे त्याने सांगितले. जवळ असलेला पैसाही संपला. प्रशासनाने आणून सोडले मात्र पुढे कुठलीही मदत केली नाही. त्यामुळे पुढील दिवस आता कसे काढायचे, अशी खंतही त्याने लोकमतजवळ व्यक्त केली.