विधिसंघर्ष बालके निघाली घरफोड्यांची मास्टरमाईंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 02:00 PM2021-09-28T14:00:13+5:302021-09-28T14:02:10+5:30
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालताना दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावेळी पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करून चोरीचा मुद्देमाल एका महिलेकडे ठेवल्याची कबुली दिली.
चंद्रपूर : शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष मोहीम राबवून दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले. या बालकांनी एक नव्हे तर चक्क चार ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ७९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जिल्ह्यात घरफोडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्या तुलनेत गुन्हे उघड होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालताना दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावेळी पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करून चोरीचा मुद्देमाल एका महिलेकडे ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी सोने-चांदीचे दागिने, नगदी रक्कम, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन गदादे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, अतुल कावळे, नितीन साळवे, प्रकाश बल्की, गणेश भोयर, सतीश बगमारे, गोपीनाथ नरोटे, विनोद जाधव, मिलिंद जांभुळे आदींनी केली.