गुप्तधनासाठी ‘त्या’ बिबट्याची शिकार? मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 10:26 AM2022-02-15T10:26:02+5:302022-02-15T10:42:45+5:30
बिबट्याची शिकार व अवयव तस्करीत एकूण ५ आरोपी वनविभागाच्या ताब्यात आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
दत्तात्रय दलाल
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : ब्रह्मपुरी वनविभागातील तोरागाव येथील रंगनाथ मातेरे याने शेतात विद्युत करंट लावून बिबट्याची शिकार केली. अवयव काढून बिबट्याला शेतात पुरले. काढलेल्या अवयवांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असताना नागपूर - भंडारा चमूने त्याला अटक केली.
ब्रह्मपुरी वनविभागाने या प्रकरणी चौकशी सुरू केल्याने शिकार केल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळावरून शिकारीसाठी वापरलेले साहित्य व बिबट्याचे अवशेष हस्तगत करण्यात आले. ही शिकार गुप्तधनासाठी झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. वनविभाग कसून तपास करत असून यामध्ये अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
विस्तीर्ण पसरलेल्या ब्रह्मपुरी वनविभागातील जैवविविधता वन्य प्राण्यांसाठी पोषक आहे. या वनविभागात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात वाघ व बिबट्याची संख्या मोठी आहे. आता विविध प्रकारे आडमार्गाने पैसा कमविण्याच्या नादात चक्क विद्युत प्रवाहाने बिबट्याची शिकार केली असल्याचे तपासात समोर आले. तोरगाव-इरवा शिवारात ही घटना उघडकीस आली. सध्या आरोपी वन कोठडीत आहे. तपास करून पुरावे गोळा करण्यात येत आहेत.
आरोपीने शिकारीनंतर दात, नखे व मिशा तस्करीकरिता काढून ठेवल्या होत्या. प्रकरण सावरला येथे घडले असल्याने ही तस्करी कोणामार्फत करण्यात येणार होती, खरेदीदार कोण होते, गुप्तधनासाठी या अवयवांचा वापर होणार होता काय की, मोठ्या शहरात वा परदेशात हे अवयव पाठविण्यात येणार होते, या सर्व बाजूंनी वनविभाग तपास करत आहे.
सखोल चौकशीनंतर खरा प्रकार समोर येणार असून या प्रकरणात एखादी टोळी असल्याचा संशय आहे. या प्रकरणात सध्या एकच आरोपी आहे. मात्र, सखोल चौकशी व तपासानंतर मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. आंतरराज्यीय टोळी या प्रकरणात आहे काय, यादृष्टीनेही वनविभागाला तपास करावा लागणार आहे.
पुन्हा चार आरोपी वनविभागाच्या जाळ्यात
बिबट्याची शिकार व अवयव तस्करीत एकूण ५ आरोपी वनविभागाच्या ताब्यात आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता वनकोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याकडून बरीच माहिती मिळणार असून आणखी किती आरोपींचा सहभाग आहे, हे तपासात समोर येणार आहे. याबाबत वनविभागाच्या उपवनरक्षक, सहायक वनरक्षक वाकडे, आर.एफ.ओ. ब्राम्हणे यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.