ताडोबालगतच्या पद्मापूर बिटात बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:28 AM2021-03-26T04:28:19+5:302021-03-26T04:28:19+5:30
चंद्रपूर : ताडाेबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या पद्मापूर बिटातील कक्ष क्रमांक १८४ मध्ये एक नर बिबट मृतावस्थेत आढळून आला. ...
चंद्रपूर : ताडाेबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या पद्मापूर बिटातील कक्ष क्रमांक १८४ मध्ये एक नर बिबट मृतावस्थेत आढळून आला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या निदर्शनास आली. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घटनास्थळापासून सुमारे २५० कि.मी. अंतरावर असलेल्या एका वाहनाला बिबट्याचे केस चिपकलेले आढळून आल्याने अपघातात मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे.ताडोबाकडे जाणाऱ्या पद्मापूर ते आगरझरी दरम्यान बिबट रस्ता ओलाडत असताना एचएच ३४ बीआर ६९७९ क्रमाकांच्या वाहनाने बिबटाला धडक दिली. या धडकेत बिबटाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. बिबटाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मानेचे हाड तुटले. पुढचा एक पाय मोडला आहे. बिबट्याचे वय सुमारे ६ वर्षाचे असून शवविच्छेदनानंतर अग्नीसंस्कार करण्यात आले. ही कार्यवाही सहाय्यक वनसंरक्षक बी.सी. येळे, मोहर्ली वनपरिक्षेत्राधिकारी आर.जी. मून, पद्मापूरचे क्षेत्र सहाय्यक के.बी. देऊरकर, आगरझरीचे क्षेत्र सहाय्यक बी.जे. गजपुरे यांच्यासह एच.बी. भट, एम.एस. शिंदे, आर. एन. ताजणे, पी.ए. कोडापे, आर.एन. धनविजय व वनकर्मचारी यांनी केली.