शिकारीच्या शोधात बिबट्या शिरला घरात! सात तासानंतर केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 11:16 AM2023-02-27T11:16:45+5:302023-02-27T11:16:56+5:30

सिंदेवाही तालुक्यातील घटना

Leopard entered the house in search of hunting! caged after 7-hours of rescue operation | शिकारीच्या शोधात बिबट्या शिरला घरात! सात तासानंतर केले जेरबंद

शिकारीच्या शोधात बिबट्या शिरला घरात! सात तासानंतर केले जेरबंद

googlenewsNext

सिंदेवाही (चंद्रपूर) : शहरापासून पाच ते सहा किलोमीटर असलेल्या मुरमाडी (कोठा) गावातील एका घरात रविवारी सकाळच्या सुमारास शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या शिरला, याची माहिती गावकऱ्यांना मिळताच एकच खळबळ उडाली. अखेर सात तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.

सिंदेवाही तालुक्यात मागील काही दिवसांपासून वाघ, बिबट्या यासारख्या हिंस्र प्राण्यांचा वावर सातत्याने दिसून येत आहे. दरम्यान, सिंदेवाही उपवन परिक्षेत्रातील मुरमाडी (कोठा) गावातील अंबादास चिरकुटा श्रीरामे यांच्या घरात रविवारी सकाळी बिबट्या मागच्या दारातून शिरला. याची माहिती पसरताच गावात एकच खळबळ उडाली. सुदैवाने घरात त्या दरम्यान कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.

बिबट्याने घरात प्रवेश केला, त्या दरम्यान घरातील सर्व बाहेरगावी काम करण्यासाठी गेले होते. मात्र गावकऱ्यांनी घरात बिबट्या शिरल्याची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर क्षेत्र सहायक विशाल सालकर, दीपक हटवार, स्वप्निल बडवाईक हे वनकर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. तोपर्यंत श्रीरामे यांच्या घरासभोवताली चांगलीच गर्दी उसळली होती. वन कर्मचाऱ्यांनी प्रथम नागरिकांना घटनास्थळापासून दूर केले.

बिबट्याला पकडण्याकरिता वनविभागाने आरआरटी पथक (शूटर) यांना पाचारण केले. बिबट्या घराच्या मागच्या बाजूने घरात येऊन लपून बसलेला होता. याआधी बिबट्याने याच गावातील कोंबड्या, कुत्रे व एका शेळीला जखमी केले होते. रविवारीही तो शिकारीच्या शोधातच गावात आला होता.

टोपलीतच केले जेरबंद...

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताडोबा येथील आरआरटी टीमला बोलविल्याने शार्प शूटरच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. मात्र बिबट्या जागचा हलत नसल्याने बिबट्याला जेरबंद करण्यात अडचणी येत होत्या. अखेर बिबट्या आरडाओरड ऐकून एका टोपलीचा आडोसा घेत लपून बसला. तब्बल सात तासांनंतर त्याच टोपलीमध्ये रेस्क्यू टीमच्या मदतीने बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. या बिबट्याचे वय एक वर्ष असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांनी दिली.

बिबट्याला बघण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली होती. यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता. या ऑपरेशनमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे, पोलिस दलाचे अजय मराठे, पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण, वनक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, वनरक्षक अतुल मोहर्ले, भोजराज दांडेकर, अमोल तिखट, सुनील ननावरे, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर, एस. बी. उसेंडी, डिके मसराम हेदेखील सहभागी झाले होते.

Web Title: Leopard entered the house in search of hunting! caged after 7-hours of rescue operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.