नागपूर-चंद्रपूर मार्गावरील व्हिडीओकॉन कंपनी परिसरात बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 08:04 PM2020-06-26T20:04:05+5:302020-06-26T20:06:05+5:30
वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या येन्सा गावाच्या शिवारात मागील काही दिवसांपासून बिबट्याने आपले बस्तान मांडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर रस्त्या लगतच्या येन्सा गावाच्या शिवारात व व्हिडीओकॉन कंपनीच्या परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने आपले बस्तान मांडले आहे. सध्या तरी या बिबट्याने मानवावर हल्ला केलेला नाही. मात्र परिसरातील कुत्र्यांना त्याने लक्ष्य केले आहे.
वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या येन्सा गावाच्या शिवारात मागील काही दिवसांपासून बिबट्याने आपले बस्तान मांडले आहे. व्हिडीओकॉन कंपनीच्या परिसरात त्याचा वावर आहे. सदर बिबट चार ते पाच वर्ष वयाचा असल्याचे समजते. व्हिडीओकॉन परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे-झुडुपे आहेत. यासोबत मजरा गाव व आनंदवन परिसराच्या मागे सदर बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. आजपर्यंत बिबट्याला अनेक नागरिकांनी बघितले आहे. सध्या बिबट्याने कुत्रे मारणे सुरू केले असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. आता शेतामध्ये पेरणी तर काही शेतात मशागतीची कामे सुरू आहे. बिबट्याच्या या परिसरात फिरण्यामुळे शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत. शेतकरी एकटा शेतात जाण्यास बिबट्याच्या भीतीने धजावत नाही. त्यामुळे शेतीच्या कामावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बिबट्याचा वावर व्हीडीओकॉन कंपनी परिसरात असल्याने त्या परिसरात गस्त घालण्यात येत आहे. ट्रॅप कॅमेरे त्या परिसरात लावले आहेत.
- विजय रामटेके, राऊंड ऑफीसर, वनपरिक्षेत्र वरोरा.