टेमुर्डा शेतशिवारात बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:07 PM2017-10-23T23:07:24+5:302017-10-23T23:07:37+5:30
तालुक्यातील टेमुर्डा गावात दोन दिवसांपासून बिबट्याने आपले बस्तान मांडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : तालुक्यातील टेमुर्डा गावात दोन दिवसांपासून बिबट्याने आपले बस्तान मांडले आहे. विठ्ठल गाते यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेली गाय या बिबट्याने फस्त केली. याच शेतातील झाडावर बिबट बस्तान मांडून असलेला अनेकांनी बघितला आहे. आताही बिबट याच परिसरात असल्याने गावकºयात दहशतीचे वातावरण आहे.
शेतीची कामे अंतिम टप्प्यात असून कापूस वेचणी सुरू झाली आहे. आधीच कापूस वेचणीला मजूर मिळत नाही. आता तर शेतात बिबट्याचा वावर असल्याने अन्य गावातील मजूरसुद्धा शेतात येण्यास घाबरत आहेत. बिबट्याने बोरगाव(शि), आसाळा, पिंपळगाव, येन्सा, कोंढाळा, टेमुर्डा, सालोरी, मेसा परिसरात वावर सुरू केला आहे. या बिबट्याचा जोपर्यंत बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत शेतीची कामे पुर्ण होणार नाही, या चिंतेने शेतकरी हतबल होत आहे. वनविभागाने तत्काळ बिबट्याला जेरबंद करून गावकºयांचे समाधान करावे. अशी मांगणी टेमुर्डाचे सरपंच मारोतराव झाडे यानी केली आहे.
बिबट कॅमेºयात कैद
गायीच्या मृत्यूनंतर वनविभागाने रविवारी घटनेचा पंचनामा करीत त्या परिसरात कॅमेरे लावले. या कॅमेºयात बिबट कैद झाल्याची माहिती टेमुर्डाचे वनपाल उराडे यांनी दिली. कोणतीही जिवीत हानी होऊ नये, यासाठी वनाधिकारी बिबट्यावर पाळत ठेवून आहेत. पिंजरे लावण्यात आलेले आहे.