सहा प्रकल्पात ५० टक्क्यांहून कमी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:00 PM2019-04-22T23:00:13+5:302019-04-22T23:01:29+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, उद्योगांना पाणी मिळावे, पाण्याची पातळी वाढावी, यासाठी जिल्ह्यात दहा मोठे सिंचन प्रकल्प कार्यान्वित आहेत. मात्र एप्रिल महिन्यातच या प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. दहा प्रकल्पापैकी तब्बल सात प्रकल्पात ५० टक्क्यांहून कमी जलसाठा शिल्लक आहे. मे अखेर या प्रकल्पांची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा वेळेवर पाऊस आला नाही तर ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना सिंचनाचा अभाव भासणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, उद्योगांना पाणी मिळावे, पाण्याची पातळी वाढावी, यासाठी जिल्ह्यात दहा मोठे सिंचन प्रकल्प कार्यान्वित आहेत. मात्र एप्रिल महिन्यातच या प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. दहा प्रकल्पापैकी तब्बल सात प्रकल्पात ५० टक्क्यांहून कमी जलसाठा शिल्लक आहे. मे अखेर या प्रकल्पांची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा वेळेवर पाऊस आला नाही तर ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना सिंचनाचा अभाव भासणार आहे.
मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने अनेकवेळा शेतकºयांना दगा दिला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकºयांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. गतवर्षी शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्याला दिलासा मिळाला. मात्र तोही क्षणिक ठरला.
आता शेतकरी पुन्हा खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे. अनेक भागात हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र शेतकऱ्यांकडे सिंचनाचा अभाव आहे. ग्रामीण भागात पसरलेले मामा तलावांचे जाळे शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत. मात्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही.
याशिवाय जिल्ह्यात दहा मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यात आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव व इरई या धरणाचा समावेश आहे. यातील सहा प्रकल्पात ५० टक्क्याहून कमी जलसाठा शिल्लक आहे. मे अखेर या धरणातील पाणी आणखी झपाट्याने कमी होईल.
चंद्रपूरकरांना तुर्तास अडचण नाही
चंद्रपूर शहराला चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या इरई धरणातून पाणी पुरवठा होतो. एप्रिल महिन्यात या धरणात बऱ्यापैकी जलसाठा आहे. इरई धरणाची क्षमता १५९.९९० दलघमी एवढी आहे. सध्या या धरणात १३६.७४५ दलघमी एवढे पाणी आहे. म्हणजे धरणात अद्याप ८५.४७ टक्के पाणी आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांना संपूर्ण उन्हाळाभर पाणी पुरवठा होऊ शकतो. तुर्तास चंद्रपूरकरांना पाण्याची टंचाई नाही. मात्र मनपाच्या नियोयजशून्यतेमुळे चंद्रपुरातील काही भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात ९७ मामा तलाव
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. यात आसोलामेंढा नामक मोठा तलाव आहे. आठ मध्यम मामा तलाव आहेत. तर ८८ लघू मामा तलाव आहेत. मोठ्या तलावात ३४.०१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आठ मध्यम तलावात ३७.२८ टक्के जलसाठा आहे तर उर्वरित ८८ लघू मामा तलावात केवळ ९.४१ टक्के पाणी शिल्लक आहे.
असा आहे प्रकल्पातील जलसाठा
आसोलामेंढा प्रकल्पात ३४.०१ टक्के पाणी आहे. घोडाझरी प्रकल्पात ९.१७ टक्के, नलेश्वर-शून्य टक्के, चंदई-२७.७१ टक्के, चारगाव-४६.४२ टक्के, अमलनाला-८२.८२ टक्के, लभानसराड-५९.६५ टक्के, पकडीगुड्डम-५६.६९ टक्के, डोंगरगाव-४३.७३ टक्के व इरई धरणात ८५.४७ टक्के जलसाठा आहे.