स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीकडे केंद्र सरकारची पाठ
By admin | Published: June 28, 2014 11:29 PM2014-06-28T23:29:39+5:302014-06-28T23:29:39+5:30
शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाला ५० टक्के नफा देऊ म्हणणाऱ्या भाजपाप्रणित केंद्र सरकारने आधारभूत किंमती वाढविताना शेतकऱ्यानची दिशाभूल केली. ‘अच्छे दिन’ आणण्याचा वादा करणाऱ्या या सरकारने
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाला ५० टक्के नफा देऊ म्हणणाऱ्या भाजपाप्रणित केंद्र सरकारने आधारभूत किंमती वाढविताना शेतकऱ्यानची दिशाभूल केली. ‘अच्छे दिन’ आणण्याचा वादा करणाऱ्या या सरकारने अगदी महिनाभरातच शेतकऱ्यांपुढे वाईट दिवसांचे ताट वाढले आहे, अशी खरमरित टिका शेतकरी संघटनेचे नेते अॅड. वामनराव चटप यांनी केली आहे.
अलिकडेच केंद्र सरकारने शेतमालाचे हमीभाव जाहीर केले. मात्र तूरडाळ आणि अन्य एकदोन धान्य वगळता सर्वच धान्याचे भाव अल्प प्रमाणात वाढविले आहेत. त्यामुळे ही शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याची टिका अॅड. चटप यांनी केली आहे. २०१४-१५ वर्षासाठी केंद्र शासनाने शेतमालाच्या आधारभूत किंमतीची घोषणा केली आहे. यात सोयाबिन, भूईमुग, मका, बाजरी या धान्याचा हमीभावात वाढ केली नाही. तर, कापूस, तूा, तांदूळ, सूर्यफुल, उडीद यात क्विंटलमागे फक्त ५० रुपयांनी वाढ केली आहे. ज्वारीसाठी ३० रुपये आणि मुग व तिळासाठी १०० रुपयांची वाढ केली आहे.
यापूर्वीच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे राज्यात आणि देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या होत्या. त्या थांबवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी स्वामिनाथन समितीने अहवाल सादर केला होता. त्यातील शिफारशी सध्याचे भाजपाप्रणित सरकार स्विकारेल अशी अपेक्षा होती. मात्र शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून निसर्गाची साथ नाही. उत्पादन खर्चात वाढ होऊनही सरकारने भाववाढ मात्र केली नाही. त्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. याचा विचार मोदी सरकारनेही केलेला नाही. शेतमालाच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी निवडणूक काळात दिले होते. मात्र ते पाळलेले दिसत नाही. काँग्रेसच्या धारणावरच हे सरकारच चालत असल्याची टिकाही त्यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)