जवाहर नवोदय विद्यालयाकडे जिल्हाधिकाऱ्यांची पाठ

By admin | Published: July 19, 2014 11:49 PM2014-07-19T23:49:59+5:302014-07-19T23:49:59+5:30

ग्रामीण भागातील हुशार, होतकरु, प्रतिभासंपन्न, गरीब विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व सोयींनी उपलब्ध व आधुनिक शिक्षण पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी

Lessons of District Officials to Jawahar Navodaya Vidyalay | जवाहर नवोदय विद्यालयाकडे जिल्हाधिकाऱ्यांची पाठ

जवाहर नवोदय विद्यालयाकडे जिल्हाधिकाऱ्यांची पाठ

Next

हरिश्चंद्र पाल - तळोधी(बा.)
ग्रामीण भागातील हुशार, होतकरु, प्रतिभासंपन्न, गरीब विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व सोयींनी उपलब्ध व आधुनिक शिक्षण पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाच्या मानव विकास मंत्रालयाच्या माध्यमातून जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची नाळ मातीशी जुळून राहावी यासाठी हे विद्यालये देशातील ग्रामीण भागात किंवा दुर्गम भागातच सुरू करण्यात आले. सदर विद्यालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली. मात्र या विद्यालयाकडे मागील तीन वर्षांपासून जिल्हाधिकाऱ्यांनी पाठ दाखविली आहे. त्यामुळे येथील समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सदर विद्यालये सुरू करताना केंद्र शासनाकडून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचे जेवण, उत्कृष्ट निवास व्यवस्था, व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी, शुद्ध व निर्जंतूक पाण्याची व्यवस्था, निरोगी सशक्त आरोग्य व्यवस्था, खेळण्यासाठी भव्य मैदाने, सर्व खेळाच्या साहित्याची उपलब्धता, प्रसंगानुसार खेळातील तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून खेळाडूंना मार्गदर्शन यामध्ये कुठलीही हेळसांड किंवा दुर्लक्ष करू नये, असे निर्देश आहे. एवढेच नाही तर यासाठी भरपूर निधीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
शालेय व्यवस्थापनात भ्रष्टाचार बोकाळू नये किंवा रायकारण होवू नये म्हणून या विद्यालयाचे व्यवस्थापन, संंपूर्ण नियंत्रण व इतरही अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्राचार्य विद्यालयाचा कार्यभार सांभाळतात.
या विद्यालयांमुळे देशातील ग्रामीण भागातील होतकरु, अभ्यासू व हुशार मुलांचे वडील आपल्या मुलांच्या विकासाचे स्वप्न रंगवू लागलेत. या विद्यालयात प्रवेश घेताना ८० टक्के ग्रामीण तर २० टक्के शहरी भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. काही वर्षांपूर्वी जवाहर नवोदय विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात उंच झेपही घेतली. त्यामुळे साहजीकच या विद्यालयात प्रवेश मिळविण्याकरिता स्पर्धा वाढली. पालकसुद्धा आपल्या मुलाला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी मुलाचा गुणात्मक दर्जा कसा वाढेल व प्रवेश कसा मिळेल यासाठी प्रयत्न करू लागले.
चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी (बा.) येथीलल जवाहर नवोदय विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी देशात नाव कमविले. गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, आय.ए.एस. अधिकारी बनलेत. मात्र मागील तीन वर्षांपासून या विद्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी साधी भेटही दिली नाही किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणीही प्रतिनिधी या विद्यालयात आले नाही. त्यामुळे प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नाही. त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ सुरू केला. तीन वर्षापूर्वी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी विद्यालयात येवून पालक- शिक्षक समितीची बैठक घेतली होती.
जिल्हाधिकाऱ्यांचे या विद्यालयाकडे झालेले दुर्लक्षामुळे येथे दिवसेंदिवस समस्या वाढत आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारा संतुलीत व सकस आहार, नास्त्यामध्ये बिस्कीट, अंडी, फळ, दूध, विद्यार्थ्यांना लिहिण्याकरिता मिळणारे नोटबुक वही, विद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील प्रसाधन गृहाची स्वच्छता, स्टेशनरी, शुद्ध व पिण्यायोग्य पाणी, खेळाचे साहित्य व प्रशिक्षकांची सोय, शैक्षणिक सहल, या सर्व आवश्यक गोष्टीच्या आर्थिक व्यवहारात सदैव कैची चालत गेली. आजच्या स्थितीत तर, या कैचीने कहरच केला. त्यामुळे जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे मनात नवोदय विद्यालयाच्या व्यवस्थापनाविषयी चिड निर्माण झाली आणि येथील प्रकार पालकांनी चव्हाट्यावर आणला. याकडे आता लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Lessons of District Officials to Jawahar Navodaya Vidyalay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.