शेततळे योजनकडे वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची पाठ
By admin | Published: July 13, 2016 02:04 AM2016-07-13T02:04:33+5:302016-07-13T02:04:33+5:30
जमिनीची भूजल पातळी वाढावी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय शेतात व्हावी, याकरीता शासनाने ‘मागेल त्या शेतकऱ्यांना शेततळे’ ही योजना...
टार्गेट अपूर्ण : अधिकारी व कर्मचारी वैतागले
वरोरा : जमिनीची भूजल पातळी वाढावी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय शेतात व्हावी, याकरीता शासनाने ‘मागेल त्या शेतकऱ्यांना शेततळे’ ही योजना युद्ध स्तरावर राबविणे सुरू केले आहे. परंतु, या योजनेत अनेक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांनी तुर्तास या योजनेकडे पाठ फिरविली आहे. दिलेले शेतकऱ्यांचे टार्गेट पूर्ण होत नसल्याने अधिकारी व कर्मचारी धस्ताविले असल्याचे दिसून येत आहे.
शासनाने शेततळ्याकरिता आॅनलाईन अर्ज शेतकऱ्यांकडून मागितल्याने प्रारंभी शेतकऱ्यांनी शेततळे करण्याकरिता मोठ्या प्रमाणात आॅनलाईन अर्ज कृषी खात्याकडे सादर केले. जेव्हा शेततळ्याचे लेआऊट व करारनामा करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्याकडे पोहचले, त्यावेळी त्यातील अनेक त्रुटी समोर आल्या. त्यात ३० - ३० शेततळे खोदण्याकरिता शासनाकडून अनुदान ५० हजार रुपये देण्यात येणार आहे.
प्रथम शेततळे खोदा, नंतर शेतकऱ्यांना बँक खात्यात अनुदान जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली. ३०- ३० मी शेततळे खोदण्याकरीता ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शेततळे खोदल्याबरोबर तात्काळ मजूर व मशीनधारकास रक्कम द्यावी लागणार. त्यामुळे आधीच नापिकीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी शेततळ्यास नकार घंटा वाजविली आहे.
यासोबत शेतात शेततळे खोदल्यास तेवढी जागा व्यर्थ जाणार शेततळ्यातील पाणी पिकांना कसे द्यावे, शेतकऱ्याची दुरुस्ती व देखभाल यावर होणार दरवर्षीचा खर्च शेतकऱ्याला करावा लागणार आहे. यामध्ये अनेक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांनी शेततळे शेतात खोदण्यास नकार दिल्याचे मानले जात आहे. शासनाने कृषी विभागास टार्गेट दिले आहे. परंतु सदर योजनेतील त्रुटी दूर करण्यास वरिष्ठ अधिकारी तयार नसल्याने येत्या काळात मागेल त्यांना शेततळे योजना भुईसपाट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)