ग्रामीण युवकांना नि:शुल्क स्पर्धा परीक्षेचे धडे
By admin | Published: April 8, 2015 12:08 AM2015-04-08T00:08:52+5:302015-04-08T00:08:52+5:30
दुसऱ्यांसाठी काही तरी वेगळ करण्याची त्यांची प्रचंड उमेद. ...
अन्य जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रतिसाद : प्रशिक्षण वर्गातील ३६ जण पोलीस दलात
रत्नाकर चटप नांदाफाटा
दुसऱ्यांसाठी काही तरी वेगळ करण्याची त्यांची प्रचंड उमेद. याच उमेदीने दुर्गम जिवती तालुक्यातील पाटण गावात त्याने नि:शुल्क पोलीस पूर्व प्रशिक्षण सुरू केले. यामुळे दोन वर्षात ३६ युवकांना पोलीस होण्याची संधी मिळाली. भिमराव व्यंकटी पवार असे प्रशिक्षण वर्ग घेणाऱ्या युवकाचे नाव असून तो जिवती तालुक्यातील पाटण येथील रहिवासी आहे.
जिवतीसारख्या दुर्गम आदिवासी तालुक्यातून १२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने पशुवैद्यकीय पदवी घेतली. त्यानंतर चंद्रपूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले. सोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. पदवी घेतल्यानंतर मानव विकास योजनेअंतर्गत कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून गावागावांत शेतकऱ्यांना त्यांनी सुविधा दिल्या. तेव्हा ग्रामीण आदिवासी दुर्गम भागातील अनेक युवक स्पर्धा परीक्षेविणा वंचित आहेत. पैसा देऊनच नोकरी व शिक्षण मिळविता येते, ही स्थानिक पालकांची व विद्यार्थ्यांची मानसिकता बदलवण्याचा विचार त्याने केला आणि गावातच नि:शुल्क पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू केले. सुरुवातीला केवळ तीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्याने प्रशिक्षण सुरू केले. अनेक ग्रामीण तरुणांमध्ये इच्छाशक्ती असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकत नाहीत. याची जाणिव ठेवून त्याने नि:शुल्क प्रशिक्षणाचे धडे दिले. आजमितीला या प्रशिक्षण केंद्रात १२० विद्यार्थी पोलीस पूर्व प्रशिक्षण भरतीचे नि:शुल्क धडे घेत असून या दोन वर्षात ३६ विद्यार्थ्यांना पोलीस खात्यात नोकरी मिळाली आहे. यांपैकी अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. त्यामुळे आता शहरी विद्यार्थ्यांचा ओढा या प्रशिक्षण केंद्राकडे वाढत आहे.
यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आदी जिल्ह्यातील युवक-युवती प्रशिक्षणासाठी पाटण येथे येत आहे. येथील व्यायामशाळेच्या इमारतीत हे प्रशिक्षण सुरू असून एकही रुपया विद्यार्थ्यांकडून घेतला जात नाही. त्याचबरोबर प्रत्येक आठवड्यात घेण्यात येत असलेल्या परीक्षेचे शुल्कसुद्धा आकरण्यात येत नाही. या सेवाभावी कार्यामुळेच पाटण ग्रामपंचायतीत उपसरपंच होण्याचा मान भिमरावला मिळाला आहे. प्रशिक्षण केंद्रासोबतच सामाजिक उपक्रमात त्याचा हिरहिरीने सहभाग असतोे. गावात युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना लाभत आहे.
या भागात मजूर आणि शेतकऱ्यांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात असून प्रत्येकांच्या मुलामुलींना शहरात शिक्षण घेणे शक्य नाही. त्यामुळे १२ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या नि:शुल्क प्रशिक्षणात सहभागी होत आहे. याचबरोबर यावर्षी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त या प्रशिक्षण केंद्रामार्फत विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे.
सुदृढ आरोग्य हवे
भिमराव पवार या युवकाने सुरू केलेल्या प्रशिक्षण वर्गात केवळ चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर अन्य जिल्ह्यातील उमेदवारही दाखल आहेत. अभ्यासाबरोबरच शारीरिक शिक्षण आणि सुदृढ आरोग्य विद्यार्थ्यांना मिळावे असे भिमराव म्हणाला.