व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात संस्काराचे धडे
By Admin | Published: May 9, 2017 12:40 AM2017-05-09T00:40:29+5:302017-05-09T00:40:29+5:30
लोकमत बालविकास व संताजी महिला मंचद्वारा आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे उद्घाटन स्थानिक संताजी भवनात झाले.
विविध विषयांवर मार्गदर्शन : लोकमत बालविकास व संताजी महिला मंचचा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकमत बालविकास व संताजी महिला मंचद्वारा आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे उद्घाटन स्थानिक संताजी भवनात झाले. यावेळी विद्यार्थ्यांना विविध संस्काराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी अॅड. दत्ता हजारे, संताजी मंडळाचे अध्यक्ष डॉ. वासुदेव गाडेगोणे, संताजी महिला मंचच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी धोपटे, लोकमत जिल्हा इव्हेंटप्रमुख अमोल कडूकर यांनी दीप प्रज्वलनाने केले. मंचावर नगरसेविका छबुताई वैरागडे, संताजी महिला मंचच्या सचिव अश्विनी आंबटकर, मुख्य प्रशिक्षक प्राचार्य श्याम धोपटे, रमेश भुते आदी उपस्थित होते.
शिबिराची सुरुवात प्राणायाम व योग साधनेने केली जाते. त्यानंतर अॅरोबिक्सचे प्रशिक्षक सागर अंदनकर यांच्याकडून दिले गेले. डॉ.मनीष मुंधडा यांनी नाक, कान, घसा याची काळजी कशी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन व तपासणीही केली. प्रा. योगेश दुधपचारे यांनी नकाशा वाचन कसे करावे, याबद्दल तर सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीपाद प्रभाकर जोशी यांनी काव्यगायन कसे करावे, हे शिकविले. त्यांच्या गंमतीदार कवितांना शिबिरार्थी रंगून गेले. निसर्गप्रेमी प्रकाश कामडे यांनी पक्षांसाठी दानापाणी पात्रे आणि घरटी कशी बनवावीत, ते प्रात्यक्षिकांसह शिकविले. वेस्टपासून बेस्ट कसे बनवावे, याचे प्रशिक्षण स्नेहल धोपटे, भुते यांनी दिले. धनंजय तावाडे यांनी वैज्ञानिकदृष्ट्या विकास करावा व अंधश्रद्धेपासून दूर राहावे, या संदेशासाठी प्रत्यक्षात अनेक प्रयोग सादर केले. त्यांनी मंत्राने यज्ञ पेटविणे, जिभेतून त्रिशूल आरपार काढणे, लिंबातून व नारळातून केस व लाल रंग, कपडे काढणे, जळता कापूर तोंडात टाकणे असे अनेक प्रयोग करून दाखविले. सुप्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ अशोक सिंह ठाकूर यांनी चंद्रपूर परिसरातील ऐतिहासिक स्थळांची व उत्खननाची माहिती दिली. त्यांनी प्रत्यक्षात अंचलेश्वर मंदिर, बीरशहाची समाधी, चंद्रपूरचा परकोट, पठाणपुरा गेट व गायमुख हनुमान परिसरातील भव्य मूर्त्यांच्या परिसराला भेट देवून विद्यार्थ्यांचेच नव्हे तर पालकांनाही ऐतिहासिक माहिती दिली. व्यक्तीमत्त्व विकासाच्या पाठ्यक्रमाची जबाबदारी मुख्य प्रशिक्षक प्रा. श्याम धोपटे यांनी सांभाळतानाच प्रभावी भाषण कला, सफलता व सकारात्मकता, क्रिएटीव्हटी, नेतृत्वक्षमता संवर्धन, समुहात्मक कार्यशैली, समय प्रबंधन या विषयावर प्रकाश टाकला. मूल्यसंवर्धनात्मक कथाकथनाची बाजू प्रभाकर धोपटे यांनी सांभाळली. शिबिरार्थींना लोकमत बालविकासाचे अमोल कडूकर व सहायक शाखा व्यवस्थापक विनोद बुले यांनीही मार्गदर्शन केले. दररोज मध्यांतरातील अल्पोपहारही विद्यार्थ्यांना आनंददायीठरत आहे. १२ मे रोजी शिबिराचा रंगारंग समारोह होईल. शिबिरार्थी बालकांसह पालकवर्ग ही शिबिराचा आनंद घेत आहे.