शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांनी फिरविली शाळेकडे पाठ
By admin | Published: November 15, 2014 10:44 PM2014-11-15T22:44:55+5:302014-11-15T22:44:55+5:30
तालुक्यातील पानोरा येथील जिल्हा परिषद शाळेत चार शिक्षक असताना त्यांपैकी एका शिक्षकाने शाळा समितीच्या बैठकीदरम्यान रेकॉर्ड फेकून शिस्तभंग केल्याने त्याची दुसऱ्या शाळेत तात्काळ
गोंडपिपरी : तालुक्यातील पानोरा येथील जिल्हा परिषद शाळेत चार शिक्षक असताना त्यांपैकी एका शिक्षकाने शाळा समितीच्या बैठकीदरम्यान रेकॉर्ड फेकून शिस्तभंग केल्याने त्याची दुसऱ्या शाळेत तात्काळ बदली करण्यात आली. मात्र शिक्षण विभागाने गावकऱ्यांच्या मागणीनंतरही तेथे नव्याने शिक्षक न पाठविल्याने बालकदिनी पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेत गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठले. या घटनेमुळे शिक्षण विभागातील नवा गोंधळ चव्हाट्यावर आला असून जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांनी दखल घेवून शिक्षण विभागाची चांगलीच कानउघाडणी केली. १४ नोव्हेंबरच्या दुपारी ही घटना घटना घडली.
पानोरा येथील जिल्हा परिषद शाळेत एकुण चार शिक्षक कार्यरत आहेत. सदर शाळेत ३० सप्टेंबर रोजी पार पडलेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत येथील तत्कालिन शिक्षक कुणाल दुधे यांनी गोंधळ घालत रेकॉर्ड फेकले, अशा समिती पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून त्यांची चेकपिपरी येथे तात्काळ बदली करण्यात आली. या कारणामुळे पानोरा जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकाची जागा रिक्त असल्याने गावकऱ्यांनी वारंवार पायपीट करून शिक्षण विभागाकडे रिक्त जागा भरण्याची मागणी केली असता शिक्षण विभागाने टाळाटाळ करून सदर गंभीर प्रकाराकडे कानाडोळा केल्याचे पानोरावासीयांचे म्हणणे आहे.
आपल्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून शुक्रवारी पानोरा येथील पालकांनी बालकदिनाच्या पर्वावर पाल्यांना शाळेत न पाठविल्याने शिक्षण विभागातील गलथान कारभाराचा प्रत्यय आला. शाळेत विद्यार्थी न आल्याचे पाहून तेथे कार्यरत इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्याचे प्रयत्न चालविले. मात्र पालक शिक्षक देण्याची मागणीवर ठाम होते. त्यानंतर पालकांनी गोंडपिपरी पंचायत समिती कार्यालय गाठले. तेथे उपस्थित जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांनी सदर गंभीर प्रकाराची दखल घेवून शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. शिक्षण विभागात चाललेल्या सावळ्या गोंधळाचा एक नवा प्रकार तेथे लक्षात आला.
यात गोंडपिपरी येथील जि.प. कन्या शाळेतील अनिल पेंढारकर नामक शिक्षकाची चेकपिपरी येथे बदली होऊन तब्बल दोन महिन्याहून अधिक काळ लोटला असतानाही पेंढारकर हे गोंडपिपरी शाळेत अतिरिक्त शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची बाब उघडकीस आली. चेकपिपरी येथील रिक्त जागेवर पानोरा येथून दुधे यांना पाठवून पेंढारकरांना न पाठविण्यामागे कारण काय? असा प्रश्न जि.प. सदस्य बोडलावार यांनी उपस्थित केला. त्यावर शिक्षण विभाग कर्मचारी निरूत्तर झाले. एकंदरीत या सर्व प्रकारावरून शिक्षकाची रिक्त जागा व आवश्यकतेनुसार शिक्षकांना न पाठविता शिक्षकांना मनाप्रमाणे गावे दिली जात असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. (तालुका प्रतिनिधी)