नव्या पिढीने ज्येष्ठांना समजून घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:03 AM2017-12-31T00:03:22+5:302017-12-31T00:03:34+5:30
नव्या पिढीने ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवातून ज्ञान मिळवावे आणि ज्येष्ठांना समजून घ्यावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांनी केले. महायोगी श्री अरविंद सभागृहात योध्दा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक-मित्र मंडळाच्या वतीने स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : नव्या पिढीने ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवातून ज्ञान मिळवावे आणि ज्येष्ठांना समजून घ्यावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांनी केले.
महायोगी श्री अरविंद सभागृहात योध्दा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक-मित्र मंडळाच्या वतीने स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते, सचिव कौरासे, कोषाध्यक्ष मांडवकर, डॉ. पी. प्रेमचंद, रमेश खातखेडे, गुलाबराव पाकमोडे, नामपल्लीवार, पंढरी गायकवाड, चंपतराव आस्वले, अण्णाजी कुटेमाटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. उमाटे म्हणाले, रात्रंदिवस काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करून मुलाबाळांना शिक्षण देवून मोठे केले जाते. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना योग्य सन्मान मिळण्याऐवजी कुटुंबातच त्यांची उपेक्षा होते. उर्वरित आयुष्य ताणतणावात आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणाकरिताच घालवतात. मनस्ताप अनावर झालेले जेष्ठ नागरिक तर कधी आत्महत्याही करतात, हे दुर्देवी आहे. नवीपिढी अशा अनुभवी आधारस्तंभापासून वंचित होवून पोरकी होत आहे. ही चिंतेची बाब असून, ज्येष्ठ नागरिकांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. सुसंवाद साधून कुटुंबात संतुलन निर्माण केल्यास सुखी जीवन जगता येते. त्यासाठीच सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असेही प्राचार्य डॉ. उमाटे यावेळी सांगितले. याप्रसंगी जेष्ठ नागरिकांकरिता संस्थेद्वारे दर महिन्यात विविध रोगांचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाते. मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. औषधोपयोगी विविध वनस्पतीची निर्मिती, संवर्धन व वितरण, वाचन लेखन व निर्मित साहित्याचे प्रकाशन, सर्व जातीय वधूवर संशोधन व पुनर्विवाह व सुक्ष्म व्याख्यान, योग, ध्यान व सत्संग आदी उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक व विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.