चंद्रपूर जिल्हा राज्यात उत्तम करण्याचा संकल्प करु या
By admin | Published: May 2, 2016 12:42 AM2016-05-02T00:42:56+5:302016-05-02T00:42:56+5:30
‘एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ’ या उक्तीप्रमाणे आपल्या विकासाचा केंद्रबिंदू दीन, दलित, शोषित, पीडित, ....
सुधीर मुनगंटीवार : महाराष्ट्र दिनाच्या मुख्य सोहळ्यात केले प्रतिपादन
चंद्रपूर : ‘एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ’ या उक्तीप्रमाणे आपल्या विकासाचा केंद्रबिंदू दीन, दलित, शोषित, पीडित, आदिवासी , शेतमजूर व शेतकरी असला पाहिजे असे सांगून चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये उत्तम जिल्हा करण्याचा संकल्प महाराष्ट्र दिनी करु या, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ते रविवारी येथे महाराष्ट्र दिनाच्या मुख्य समारंभात ध्वजारोहण केल्यानंतर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचलार्वार, आ. नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरशे, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, अपर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, सभापती देवराव भोंगळे, स्वातंत्र सैनिक, अधिकारी, पत्रकार व विद्यार्थी पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन गरजेचे असून १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लावण्याचा व संवर्धन करण्याचा संकल्प आहे. आपल्या जिल्हयात या योजनेंतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लावून पर्यावरण संतुलनासाठी पुढाकार घ्यावा.
जलयुक्त शिवार हा महाराष्ट्र शासनाचा लोकसहभागातून पुढे जाणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या वर्षी या योजनेत जिल्हयातील २४९ गावांची निवड करण्यात आली असून या अभियानात डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेतील ३६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागातील १३,६६७ लाभार्थ्यांची रमाई आवास घरकूल योजनेंतर्गत निवड करण्यात आली असून त्यांना निधी वितरित करण्यात आला आहे. तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व जमातीच्या ४,४७० लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेत घरकुल मंजूर करण्यात आले आहे.
चंद्रपूर तालुक्यात चिचपल्ली येथे स्थापन करण्यात येत असलेल्या बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी १६ कोटी ७८ लक्ष ७२ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अल्पसंख्यकबहुल नागरी तसेच ग्रामीण क्षेत्राच्या विकास कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर व बल्लारपूर शहर तसेच राजोली, कोठारी, नांदगाव पोडे, बामणी, विसापूर या गावांमधील विकासकामांसाठी ७५ लक्ष ६३ हजार ७८६ रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे. बल्लारपूर व चिमूर येथील तालुका क्रीडा संकुलासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असून चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालय नूतनीकरण, बांधकाम, रंगरंगोटी इत्यादी बाबतच्या आठ कोटी ४२ लक्ष २७ हजार रुपये किमतीच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. रुग्णालयाचे काम वेगाने करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या ठेव रकमेत वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या अर्थसंकल्पात सदर ठेव रक्कम ५ कोटींवरुन १० कोटी रुपये करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर मुल आणि बल्लारपूर येथील बसस्थानकांचे आधुनिकीकरण व दजार्वाढ करण्यासाठी १३ कोटी ९४ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला. विविध क्षेत्रात पुरस्कार तसेच प्रावीण्य मिळविणाऱ्या अधिकारी, पोलीस व उद्योजक यांचा सत्कार यावेळी सत्कार करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने संविधानाची प्रास्ताविका व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र ना.मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांना देण्यात आले. (प्रतिनिधी)