पंचप्रण शपथेतून चंद्रपूरला प्रगत करण्याचा संकल्प करुया; ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवारांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 02:28 PM2023-08-25T14:28:53+5:302023-08-25T14:29:40+5:30

उत्तम आयोजनाबद्दल जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक

Let us resolve to advance Chandrapur by the Panchapran Oath; Minister Sudhir Mungantiwar's call in the program 'Meri Mati Mera Desh' | पंचप्रण शपथेतून चंद्रपूरला प्रगत करण्याचा संकल्प करुया; ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवारांचे आवाहन

पंचप्रण शपथेतून चंद्रपूरला प्रगत करण्याचा संकल्प करुया; ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवारांचे आवाहन

googlenewsNext

चंद्रपूर: देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ (माझी माती माझा देश) या अभिनव उपक्रमातून होत आहे. भारतमाता आणि या देशाच्या मातीचे आपल्यावर नेहमीच ऋण राहिले आहे. त्यामुळे आता मातेसोबत मातीच्याही रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे. आज आपण माती हातात घेऊन पंचप्रण शपथ घेतली. ही केवळ शपथ नसून या माध्यमातून चंद्रपुरला देशात सर्वांत प्रगत जिल्हा म्हणून नावलौकीक मिळवून देण्याचा आपण संकल्प करुया, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर मार्गावरील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यान येथे ‘मेरी माटी मेरा देश’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा समारोप झाला. 

जिल्हा प्रशासनाने ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात अतिशय उत्साहाने राबविल्याबद्दल मुनगंटीवार यांनी कौतुक केले. मुनगंटीवर म्हणाले, ‘आपण शिलाफलकांवर विरांची नावे लिहिली, त्यांना नमन केले. वसुधा वंदन अंतर्गत वृक्षारोपण, पंचप्रण शपथेतून देशाच्या विकासात योगदान देण्याचा संकल्प, आदी बाबी या उपक्रमांतर्गत करण्यात आल्या. ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका सन्मान’ यानुसार देश प्रगतीपथावर जात आहे. देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देशाला प्रगत केले. आपला देश हा नेहमीच धनसंपन्न, गुणसंपन्न, ज्ञानसंपन्न होता आणि राहील. मात्र त्यासाठी आपल्याही योगदानाची आवश्यकता आहे.’

तत्पूर्वी पालकमंत्री यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यानात उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे अनावरण, वसुधा वंदन अंतर्गत वृक्षारोपण, ध्वजारोहण करण्यात आले. गोवा मुक्ती संग्रामातील डॉ.शेषराम बळीराम इंगोले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सुशिलाबाई आनंदराव उरकुडे, उषाताई कृष्णा हजारे, लक्ष्मीबाई पांडुरंग चौधरी, विठाबाई लक्ष्मण काहीलकर, रामाजी बालाजी बडघरे, विजय बाबुराव थोरात, शांताबाई काळे तसेच शहीद पोलीस साधूजी नारायण चांदेकर, प्रकाश जयराम मेश्राम, शहीद सैनिक गोपाल भिमनपल्लीवार, योगेश वसंत डाहुले, प्रवीणकुमार कोरे तसेच शौर्यचक्र प्राप्त शंकर गणपती मेंगरे यांच्यासह शहीद कुटुंबीयांचा सत्कार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.

चंद्रपूर वाघाची भूमी

९ ऑगस्ट १९४२ रोजी इंग्रजांना ‘चले जाव’ म्हणत क्रांतीची मशाल पेटली होती. त्याची दखल चंद्रपूरातील चिमूर या गावाने घेतली. १६ ऑगस्ट रोजी चिमूर येथे इंग्रजांविरुध्द उठाव झाला आणि भारतातील पहिले स्वातंत्र्य चिमूरला मिळाले. चंद्रपूर ही क्रांतीची आणि वाघाची भूमी आहे. अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी वाघनखे भारतात परत आणण्याचे सौभाग्य चंद्रपूरचा भूमीपुत्र आणि या राज्याचा सांस्कृतिक मंत्री म्हणून मला मिळाली आहे, याचा अभिमान वाटत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. प्रतापगडावरचे भवानी मातेचे छत्र आणि रायगडावरून छत्रपतींची निघणारी पालखी चंद्रपूर येथून दिली आहे. एवढेच  नाही तर अयोध्येतील राममंदिरासाठी आणि सेंट्रल व्हिस्टा या नवीन संसद भवनाच्या दरवाजाकरीता चंद्रपूरचे लाकूड वापरण्यात आले आहे, याचा उल्लेख पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केला.

कौतुकाची थाप

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनाने चंद्रपुरात ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाचे अतिशय उत्तमरित्या आयोजन केले. यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक, मनपा आयुक्त यांचे तसेच सैनिक स्कूल आणि रफी अहमत किडवई शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट देशभक्तीपर गीत आणि नृत्य सादर केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी कौतुकाची थाप दिली.

प्रत्येक तालुक्यात देशभक्तीपर गीत स्पर्धा

'मेरी माटी मेरा देश' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले देशभक्तीपर गीत आणि नृत्य अप्रतिमच होते. जिल्ह्यातील सर्व पंधरा तालुक्यांमध्ये देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आयोजित करावा, अशा सूचना मुनगंटीवार यांनी केल्या. 

विकासाचा संकल्प करा

आपल्याला सीमेवर जायचे नाही, मात्र गावाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी संपूर्ण शक्तीनिशी काम करायचे आहे. सरपंचांनी गावाच्या विकासासाठी योजना आखावी. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी  व इतर कर्मचारी आणि नागरिकांनी आपले गाव विकसीत केले पाहिजे. गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल. सर्व ग्रामपंचायतींनी आरोग्य, शिक्षण, कृषी यात पुढे जाण्याचा संकल्प करावा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले. 

वयोवृध्दांची आरोग्य तपासणी

शहीद परिवारातील सदस्य, स्वातंत्र्य संग्राम सैनिक तसेच इतर वयोवृध्द नागरिकांची आरोग्य तपासणी करावी. त्यासाठी स्वतंत्र टीम तयार करावी. या नागरिकांना काठी, व्हिलचेअर तसेच वृध्दापकाळात जी मदत लागेल, ती वैयक्तिकरित्या आपण करू, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

मुनगंटीवार यांच्यामुळे लौकिक - किशोर जोरगेवार

आमदार किशोर जोरगेवार यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यामुळे सांस्कृतिक विभागाला लौकीक मिळाल्याची भावना व्यक्त केली. ‘अतिशय चांगला कार्यक्रम जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि मनपाने आयोजित केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक विभागाला नवीन नावलौकिक मिळवून दिला आहे. नवनवीन उपक्रमांद्वारे एक वेगळी छाप त्यांनी राज्यात आणि देशात उमटविली आहे. चंद्रपूर हे देशाच्या मध्यभागी आहे. देशाच्या विकासात चंद्रपूरच्या नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे,’ असे मत त्यांनी मांडले. 

वृक्षसंवर्धन मोहीम बळकट होईल - जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी गौडा यांनी वृक्षसंवर्धन मोहीम बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला. ‘पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात मेरी माटी मेरा देश या उपक्रमाची सांगता होत आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. वीरपुत्रांचा सन्मान करण्यात आला. ७५ स्थानिक प्रजातींच्या झाडांची अमृत वाटिका येथे तयार करण्यात येत आहे. ही अमृत वाटिका स्वातंत्र्याच्या चळवळीची आठवण करून देईल. अमृत वाटिकेच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन मोहीम देखील अधिक बळकट होईल,’ असेही 

विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार

वक्तृत्व स्पर्धेमध्ये महेक जाकीर शेखने प्रथम क्रमांक तर सोनाक्षी सिद्धार्थ निमगडे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. निबंध स्पर्धेत हर्षा योगराज ठाकूरने प्रथम तर रिदा राजेश गावंडे हिने द्वितीय पुरस्कार पटकावला. चित्रकला स्पर्धेत श्रुती राजेंद्र पाठक (प्रथम), यश गणेश लसणे (द्वितीय), घोषवाक्य स्पर्धेत समीक्षा रवींद्र पोईंकर (प्रथम), प्रशांत उंदीरवाडे (द्वितीय) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यांनाही पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Web Title: Let us resolve to advance Chandrapur by the Panchapran Oath; Minister Sudhir Mungantiwar's call in the program 'Meri Mati Mera Desh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.